कर्वेनगरामध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही

मविआचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्यासमोर कुमार बराटे यांनी मांडली कैफियत


पुणे : महाविकास आघाडीचे कोथरुडचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा कर्वेनगरात पदयात्रेद्वारे जोरदार प्रचार सुरू असून,  कर्वेनगरचा संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला आहे. प्रचारा दरम्यान नागरिक विविध समस्या त्यांच्यासमोर मांडत आहेत. कर्वेनगर गावठान आणि अन्य परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदानाची उपलब्धता नाही. त्यामुळे भविष्यातील खेळाडू कसे निर्माण होतील, असा प्रश्न कुमार बराटे यांनी मोकाटे यांच्यासमोर उपस्थित केला.

बराटे पुढे म्हणाले की, पूर्वी पुणे महापालिकेच्या सम्राट अशोक विद्यालयाच्या मैदानात या परिसरातील मुले खेळत होती. पण काही वर्षांपूर्वी पुणे मनपाने या मैदानात 3 मजली इमारत बांधली व मैदानाचा आकार छोटा केला गेला, त्यामुळं या परिसरातील मुलांची मोठी कुचंबणा होते आहे. 

या परिसरातील मुलांना कबड्डी, क्रिकेट,  खो-खो अशा विविधांगी खेळांची आवड आहे. या परिसरातील मुले-मुली वेगवेगळ्या संघातून खेळून कर्वेनगर परिसराचे नाव उंचावत आहेत. त्यांना खेळापासून किती दिवस वंचित ठेवायचे, असा प्रश्न कुमार बराटे यांनी केला. 

बराटे यांचे समाधान करताना चंद्रकांत मोकाटे यांनी कर्वेनगरातील मैदानाविषयी लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले. 



Post a Comment

0 Comments