पुण्यातील `लोढा-बेलमोंडो`मधील सोसायटीतील नागरिकांची जोरदार निदर्शने

बिल्डर मंगलप्रभात लोढांच्या कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात रहिवासी आक्रमक




पुणे : राज्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांच्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गानजीक असलेल्या लोढा-बेलमोंडो या उच्चभ्रू सोसायटीतील लोकांनी रविवारी बिल्डरच्या मनमानी व फसवणुकीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. या वेळी सर्वांनी बिल्डर लोढांच्या विरोधातील बॅनर आणि हातात काळे झेंडे घेतले होते. या सर्वांनी बिल्डर लोढांकडून सेवा शुल्काच्या करण्यात येत असलेल्या लुटीचा व विविध प्रकारच्या नियमभंगाच्या विरोधात निषेध नोंदवला आहे.

                                       

पुणे शहरातून मुंबईकडे निघाल्यानंतर ज्या ठिकाणाहून यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग सुरू होते, त्याच्या अगदी बाजूलाच म्हणजे गहूंजे परिसरात लोढा - बेलमोंडो ही उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये अनेक टोलेजंग इमारती आहेत. या सोसायटीची उभारणी ही सध्या राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मालकीच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड कडून करण्यात आली आहे. ज्या वेळेस या इमारतींची बांधणी करण्यात येत होती, त्या वेळी या प्रकल्पाची त्याची प्रचंड जाहिरातबाजी करण्यात आली.




या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांच्या व्यथा रविवार २२ जानेवारी रोजी `वेबन्यूज-२४`च्या समोर मांडल्या. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अत्यंत सुखवस्तू सुविधा मिळतील, असे आश्वासन तेंव्हा मॅक्रोटेक डेव्हलपर्सने दिले होते. आजवर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टोलेजंग इमारतींमध्ये एकूण २८०० फ्लॅटधारक राहत आहेत. मात्र, येथील फ्लॅटधारकांना ज्या काही सुविधा प्रदान करणे नियमानुसार गरजेचे होते, त्यातील अनेक सुविधा आजवर मिळाल्याच नाहीत. 



या सोसायटीतील रहिवाशांचा आरोप आहे की, बिल्डर लोढा यांनी त्यांचा मोठा विश्वासघात केला आहे. रहिवाशांनी सांगितले की, आम्ही जेंव्हा या ठिकाणी सदनिका खरेदी केल्या, त्या वेळी आम्हाला विश्वासात न घेताच करारनामा केला गेला. याशिवाय बिल्डरकडून मेन्टेनेन्सच्या नावाखाली अवाजवी रक्कम आजही उकळण्यात येत आहे. सोसायटीचे बांधकाम करताना जी गुणवत्ता ठेवायला पाहिजे होती ती गुणवत्ताही ठेवली नाही.






सोसायटीचे काम पूर्ण झाल्यानंतर व फ्लॅटधारक येथे रहायला आल्यानंतर लगेच एक सोसायटी रजिस्टर करून ती स्थानिक रहिवाश्यांना हस्तांतरित करणे गरजेचे होते. परंतु तसे काहीही केले नाही. शिवाय बिल्डरने कन्व्हेयंस डीड करून दिली नाही. स्थानिक रहिवाशांनी जेंव्हा सोसायटी व फेडरेशनची नोंदणी केली, तेंव्हा ती खुद्द लोढांच्या कंपनीनेच बेकायदेशीररित्या रद्द केली.


याशिवाय ग्राहकांनी इन्शुरन्स पाॅलिसीच्या काॅपी वारंवार बिल्डरकडे मागितल्या. परंतु त्या अद्यापही दिल्या गेल्या नाहीत. स्वतःच्या लोन व इन्शुरन्सचा खर्च सोसायटीच्या अकाउंटमधून केला जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.



मॅक्रोटेक कंपनी आज अत्यंत चुकीच्या पद्धतीने स्थानिक रहिवाशांकडून मेन्टेनन्स शुल्क वसूल करीत आहे. प्रति चौरस फुटाच्या हिशोबाने ही अवाजवी रक्कम वसूल केली जात आहे, जी हजारो रुपयांच्या घरात आहे. आजवर ही जी रक्कम वसूल करण्यात आली, त्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचे बिल्डरने काय केले, याचा हिशेबदेखील तो देत नसल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.


मॅक्रोटेक डेव्हलपर्स या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकाम करीत असल्याचा आरोपही स्थानिकांनी या वेळी केला. हे बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. 


आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, जेंव्हा-जेंव्हा ते मॅक्रोटेक डेव्हलपर्सकडे न्याय्य मागण्या ते करीत राहिले, तेंव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. तसेच मॅक्रोटेक बिल्डर्सचे मालक व राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कंपनीने रेरा आणि मोफा कायद्याचे उघडपणे उल्लंघन केले आहे. तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.


या संपूर्ण समस्यांचा लवकरात लवकर निपटारा नाही केला गेला, तर येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी सर्व रहिवाशांनी दिला. या आंदोलनात लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच जण सामिल झाले होते. सर्व आंदोलनकर्त्यांमध्ये बिल्डर लोढा यांच्याविरोधात जोरदार आक्रोश दिसून आला. 



आंदोलनाची बातमी सविस्तर पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर बघा...  


 - आंदोलनातील प्रमुख मागण्या

* प्रकल्पातील वाढीव बांधकाम तात्काळ थांबवावे

* फेडरेशनची लवकरात लवकर नोंदणी करून सर्व हिशेब व कारभार फेडरेशनकडे सोपवावा

* पर्यावरण दाखला मिळवताना लादलेल्या अटींची योग्य पुर्तता करावी

* सोसायट्यांचे कन्व्हेयन्स डीड लवकरात लवकर करून द्यावे

* सर्व ओपन स्पेस व अॅमिनिटीज तात्काळ हॅन्डओव्हर कराव्यात

* कार्पेट एरिया बाबत केलले्या फसवणुकीसाठी फ्लॅटधारकांना तेव्हढी रक्कम परत करावी

* सोलर पाॅवर आणि सोलर हिटरची नियमाप्रमाणे सोय करावी

* गोल्फ कोर्स, क्लब व स्पा यासारख्या अॅमिनिटीजच्या केलेल्या पर्पेच्युअल लीज रद्द करा

* इमारत क्रमांक २४ च्या मागील बेकायदा एक्सेस रोड बंद करावा

* जमा खर्चाचे आॅडिटेड ताळेबंद सादर करावे वा उर्वरित रक्कम तथा सर्व व्यवहार हस्तांतरित करावे

* आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व अॅमिनिटीज द्याव्या

* निकृष्ट बांधकाम जेथे झाले आहे तो दुरुस्त करून द्यावे

* विक्री न झालेल्या फ्लॅटचा मेंटेन्स बिल्डरने भरावा

* इन्शुरन्स पाॅलिसीजच्या काॅपीज सोसायट्यांना दिल्या जाव्यात

* सेकंड सेलमध्ये सदनिका घेणाऱ्यांचे एक्स्ट्रार्शन थांबवावे

* बिल्डरने बेकायदेशीररित्या स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या जागा व कार्यालये त्वरित हस्तांतरित करावी



Post a Comment

0 Comments