मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पुण्यात असताना फोडल्या गेल्या गाड्या

शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर




पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मंत्री हे शहरात कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच व्यस्त असताना असताना गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी धनकवडी परिसरात काही गावगुंडांनी गाड्यांची प्रचंड तोडफोड केली आहे. दरम्यान, या प्रकरणी जास्त बोभाटा होऊ नये, म्हणून पोलिसांकडून तक्रार न घेता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.
 

कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा 24 फेब्रुवारीला शेवट होत असताना भाजप-शिवसेना व महाविकास आघाडी दोघांकडूनही जोरदार प्रचार केला जात आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. अशा स्थितीत भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास अर्धे मंत्री पुण्यातच प्रचारासाठी फिरत आहेत.




अशा दिग्गजांची पुण्यात उपस्थिती असताना गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी रात्री काही अज्ञात गुंडांनी शहरातील धनकवडी भागातील बालाजी नगर परिसरात असलेल्या रजनी काॅर्नर बिल्डिंग जवळ काही गाड्यांची जोरदार तोडफोड केली. यामध्ये अनेक आलिशान चारचाकी गाड्यांसह आटोरिक्षांचे काचा फुटून नुकसान झाले. 


- पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ 

एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी आणि दुसरीकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पुण्यात असताना घडलेल्या या घटनेने पोलिस यंत्रणेचे धाबे दणाणले असून, याचा जासात बोभाटा होऊ नये, तसेच विरोधकांना आयतेच कोलित मिळू नये, यासाठी पोलिसांकडून या प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्सास टाळाटाळ होत असल्याची खात्रिलायक माहिती आहे. शुक्रवार 24 फेब्रुवारी सकाळी जेंव्हा तोडफोड झालेल्या गाड्यांचे पीडित मालक तक्रार देण्यासाठी सहकार नगर पोलिस स्टेशनला गेले तेंव्हा पोलिसांनी तक्रार घेण्यासच टाळाटाळ केली.


पोलिसांना याबाबत पीडितांनी विचारले असता, ही घटना रात्रीची आहे. आम्ही दिवसपाळीचे आहोत, असे थातूरमातूर उत्तर देण्यात आले. पुणे शहर हे शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी आहे. सूज्ञ लोकांचे शहर आहे. त्यामुळे तुलनेने पुणे शहर शांत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील काही भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. त्यानंतर काही भागात अशा तोडफोडीच्या घटना होताना दिसून येत आहेत.



काही दिवसांपूर्वी शहरातील एका भागात अशाचप्रकारे कोयता गँगने दहशत पसरवल्यानंतर नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी त्या ठिकाणच्या एका सीनियर पोलिस इन्स्पेक्टरची बदली थेट पोलिस कंट्रोल रूमला केली होती. तशाच प्रकारची कारवाई आपल्यावर होऊ नये, यासाठीही पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. दरम्यान, या प्रकरणी तक्रार घेण्यास का टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न पीडित गाडीचालकांकडून उपस्थित केला जात आहे.


कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सरकारवर कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून आक्रमक होत टीका करायचे. आता तेच खुद्द उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील जवळपास अर्धे सदस्य पुण्यात असताना वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Post a Comment

0 Comments