सकारात्मक विचार करा, उत्तम कार्य करा : झोराष्ट्रीयन कॉलेज अध्यक्षा डॉ. मेहेर मास्टर मूस

प्रेषित झरथुष्ट्र व हुएन-ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण; एमआयटी एडीटी येथील विश्वातील भव्य घुमटात रंगला सोहळा


पुणे  : सकारात्मक विचार ठेवा, उत्तम कर्म करा आणि चांगले बोला, असा संदेश प्रेषित झरथुष्ट्र यांनी मानवतेला दिला, तर महात्मा गांधींनी प्रेम आणि अहिंसेच्या शक्तीच्या आधारे विश्वशांतीसाठी प्रयत्न केले. जगातील सर्व धर्म हाच मानवतावादी संदेश दिला आहे, असे मत झोराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेहेर मास्टर मूस यांनी बुधवारी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीचे औचित्य साधून विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि माईर्स एमआयटी आर्ट्स, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित दहाव्या वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, स्पिरिच्युअलिटी/रिलिजन अँड फिलॉसॉफीच्या पूर्वसंध्येला पारशी (झोराष्ट्रीयन) धर्माचे संस्थापक प्रेषित झरथुष्ट्र आणि चीनी बौद्ध भिक्षू व महान दूरदर्शी विद्वान-विचारवंत-तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ आणि वर्ल्ड पार्लमेंटच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, जहांगीर रुग्णालयाचे अध्यक्ष श्री. जहांगीर, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. मंगेश कराड, एमआयटी डब्लूपीयू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आदी मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गांधी जयंतीचे औचित्य साधून जगातील सर्वांत मोठ्या विश्वशांती घुमटात दोन महामानवांचे पूर्णाकृती पुतळे स्थापन केल्याबद्दल डॉ. मेहेर मास्टर मूस यांनी डॉ. कराड यांना शुभेच्छा दिल्या. सर्व धर्मांनी आपल्या तत्वज्ञानातून चांगले मानव घडविण्याचा संदेश दिला आहे. त्या आधारेच विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड शिक्षणाच्या माध्यमातून चांगले मानव घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद करत कृतज्ञता व्यक्त केली. 

प्रेषित झरथुष्ट्र आणि तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यासारख्या महामानवांनी मानवतेला विश्वशांती आणि एकोप्याचा संदेश दिला. सध्या जग गोंधळ, संभ्रम, हिंसाचार आणि दहशतवादाचा सामना करत असताना, या महान व्यक्तींचा संदेश समाजात प्रसृत होणे आवश्यक आहे. त्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी स्वहितापेक्षा विश्वकल्याणाचा विचार केला पाहिजे आणि ज्ञानाची पूजा केली पाहिजे, असे मार्गदर्शन प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना केले. विश्वशांती घुमट हा ज्ञानपूजेचे स्थान असून, भारत विश्वगुरू होण्यासाठी समाजाला दिशा देण्याची जबाबदारी पार पाडत आहे, असेही ते म्हणाले. 

तत्पूर्वी, प्रमुख अतिथी जहांगीर म्हणाले, विश्वशांती घुमटाचा परिसर हा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, तसेच सर्व धर्मीयांचे धार्मिक स्थळ आहे. चांगले बोला, सकारात्मक विचार करा आणि योग्य कृत्य करा, असा संदेश देणाऱ्या प्रेषितांचे व महामानवांचे पुतळे सर्वांसाठी प्रेरणादायी असून, हे घुमट एकात्मतेचे मंदिर होवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. 

डॉ. भटकर म्हणाले, नवीन विचार दाबण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ते नवीन रुपात पुन्हा उदयास आले आहेत. तक्षशिला-नालंदा ही विद्यापीठे जाळली गेली, तरीही ती विश्वशांती घुमटाच्या माध्यमातून पुनःस्थापित होऊन मानवतेला शांततेचा संदेश देत आहेत. 

प्रा. राहुल कराड म्हणाले, या विश्वशांती घुमट परिसरात ५४ महामानवांचे पुतळे असून, त्यांनी मानवतावादाचा पाया रचला, तसेच समाजाला भविष्यवेधी विचार दिला. रस्ते वेगळे असले, तरी अंतिम उद्दिष्ट एकच आहे आणि ज्ञानाचा उपयोग हा मानवाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले, प्रेषित झरथुष्ट्र आणि हुएन-ए-त्संग यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले. चेतनेच्या जाणीवेतून सत्याचा शोध घेत मोक्ष प्राप्त करणे, हा आपल्या जीवनाचा खरा उद्देश असला पाहिजे, असा संदेश सर्व संतांनी दिला आहे. याच तत्वातून हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण देत त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणून वैश्विक जबाबदार नागरिक घडवित आहे. विश्वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments