राष्ट्रीय, विभागीयस्तरावरील चार पुरस्करांवर आयसीएआय पुणेची मोहोर
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील दोन, तर विभागीय स्तरावरील दोन अशा चार पुरस्कारांवर 'आयसीएआय पुणे'ने नाव कोरले आहे.
आर्थिक वर्ष २०२३ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम शाखा व सर्वोत्तम विद्यार्थी (वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन- विकासा) शाखेचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. विभागीय स्तरावर पुणे शाखेला प्रथम, तर 'विकासा'ला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
नुकत्याच झालेल्या वार्षिक समारंभात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते, 'आयसीएआय'चे अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी व उपाध्यक्ष सीए रणजित कुमार अगरवाल यांच्या उपस्थितीत या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण झाले. 'आयसीएआय'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल व 'विकासा पुणे'चे अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी 'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, सचिव सीए अजिंक्य रणदिवे, खजिनदार सीए ऋषिकेश बडवे, 'विकासा पुणे'चे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, 'विकासा पुणे'चे उपाध्यक्ष साईराम खोंड, सचिव माधवीक शाह, खजिनदार समीक्षा शिरसाट, स्नेहा वेदपाठक, ओंकार फापाळ, सुहास सावंत आदी उपस्थित होते.
दरवर्षी संस्थेच्या राष्ट्रीय व पश्चिम विभागीय कार्यालयातून सर्वोत्तम शाखेचे, तसेच विद्यार्थी शाखेचे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय स्तरावरील शाखांमध्ये पुणे शाखेने आणि 'विकासा' या विद्यार्थी शाखेने पात्रतेच्या निकषांप्रमाणे काम करत हे पुरस्कार प्राप्त केले.
सीए राजेश अग्रवाल म्हणाले, "वर्षभर आयसीएआय पुणे शाखेतर्फे विविध कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, राष्ट्रीय परिषदा, सामाजिक उपक्रम, सनदी लेखापालांसाठी कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अनेकांचे सहकार्य, मार्गदर्शन व विश्वास लाभला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानून हे पुरस्कार 'आयसीएआय' पुणे शाखामधील सर्व सदस्य, विद्यार्थी आणि कष्टकरी कर्मचाऱ्यांना समर्पित करतो.
२०२३-२४ या वर्षात शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून हा पुरस्कार आपल्या सीए शाखेला मिळाला आहे. मागील पाच वर्षापासून विविध पदांवर काम करत होतो. त्या काळात, माझे कमिटीतील सहकारी, सर्व माजी अध्यक्ष, सीए सभासद, विद्यार्थी, माझी आई, पत्नी, मुली, माझा मित्रपरिवार, तसेच ज्ञात, अज्ञात अनेकांचे सहकार्य मिळाले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो."
0 Comments