राज्यसभेसाठी भाजपचे राज्यातील शिलेदार झाले निश्चित

अशोक चव्हाणांना पक्षात प्रवेश करताच खुर्ची, तर निष्ठावंत मेधा कुलकर्णींवरही मेहेरनजर


पुणे - केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, पक्षात नव्याने आलेले व जुन्या निष्ठावंतांचा समतोल भाजपने साधला आहे.

एकच दिवसापूर्वी पक्षात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना पक्षात प्रवेश करताच राज्यसभेची लाॅटरी लागली असून, पक्षाच्या जुन्या निष्ठावंत मेधा कुलकर्णी यांनाही पक्षाने संधी दिलेली आहे. याशिवाय भाजपच्या डाॅक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. अजिक गोपछडे यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. भाजपच्या जुन्या निष्ठावंत पंकजा मुंडे यांच्या पदरी या वेळीही निराशा आल्याचे या नावांमुळे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते, दोन वेळेसचे मुख्यमंत्री, अनेक वर्षे कॅबीनेट मंत्री, आमदार आणि खासदार राहिलेल्या अशोक चव्हाण यांना पक्षाने एकीकडे उमेदवारी दिली, तर दुसरीकडे निष्ठावंतांनाही डावलले नाही. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड विधानसभेची जागा सोडली होती. तेंव्हा त्यांना योग्य ती संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते.

परंतु त्यानंतर बरेच दिवस संधी  न मिळाल्यामुळे मेधाताई काहीशा नाराज झाल्या होत्या. त्यांनी यासंदर्भात जाहीरपणे आपली नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात मेधा कुलकर्णी यांना संधी देण्याबाबत दबाव होता. अखेर पक्षाने निष्ठावंतांचे खच्चीकरण नकोय म्हणून मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपले नाव घोषित झाल्याबरोबर मेधा कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले. मेधा कुलकर्णी यांच्या रुपाने भाजपने पुन्हा एकदा आपला पुणे लोकसभेचा गड मजबुत राखण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.  

डाॅ. अजित गोपछडे हेही पक्षाचे जुने निष्ठावंत आहेत. अनेक वर्षांपासून ते पक्षाच्या डाॅक्ट सेलच्या माध्यमातून कार्यरत होते. डाॅ. अजित यांची पार्श्वभूमी ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आहे. त्यांनी पक्षात अनेक वर्षे निष्ठेने काम केलेले आहे. राम मंदिर आंदोलनातही त्यांचे नाव अग्रणी होते.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडे सध्या 104 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचे तीनही उमेदवार निवडून येणे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, भाजपच्या जुन्या-जाणत्या निष्ठावंत पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यांच्या नावाचा पत्ता पुन्हा एकदा कट झाला आहे. गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे पक्षात त्यांना दुर्लक्षित केले जात असल्याबद्दल सातत्याने सौम्य भाषेत खंत व्यक्त करताना दिसून येत आहेत.

Post a Comment

0 Comments