पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले. प्रभात रस्त्यावरील सिम्बायोसिस शाळेच्या मैदानावर नुकतेच या क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.
टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि स्विमिंग या तीन क्रीडा प्रकारात सूर्यदत्तच्या विद्यार्थिनी चमकल्या आहेत. वाण्या क्षत्रिय, यशश्री साबळे व हर्षिता अमृतकर यांनी टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक, अदिती व्हावळ हिने बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक, तर सौम्या दौंडगावळ हिने स्विमिंग स्पर्धेत (ब्रेस्ट स्ट्रोक) रौप्यपदक पटकविले आहे.
सूर्यदत्त स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडेमीच्या क्रीडा समन्वयक दिलप्रीत कौर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सूर्यदत्तच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय राहिली. मुलींनी दाखवलेली समर्पण भावना, कठोर परिश्रम आणि खिलाडू वृत्ती कौतुकास्पद होती. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सूर्यदत्तच्या विद्यार्थिनींनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. शैक्षणिक उपक्रमांसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, क्रीडा नैपुण्य विकसित करण्यावर दिला जाणारा भर हे या यशातून प्रतीत होते. सूर्यदत्त स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडेमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी प्रोत्साहन व आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते."
0 Comments