दि. ७ आॅक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर प्रचंड असा खुनी हल्ला चढवला आणि एका अती दाहक युद्धाचा असा भडका उडाला. हमासच्या हल्ल्यात इस्राइलमधील निष्पाप नागरिक मारले गेलेत, यात काहीच दुमत नाही. हमासच्या या हल्ल्याचे कुणीही मानवतावादी समर्थन करू शकत नाही. मात्र, झालेला हा हल्ला काही एक घटना नव्हती. वर्षानुवर्षांपासून इस्राइलचे दमन, गाझातील नागरिकांच्या गुदमरलेल्या आयुष्याचा उडालेला तो उत्तुंग असा भडका होता. अर्थात, निष्पाप नागरिक कुठलेही असोत, त्यांच्यावरील हल्ल्याचे समर्थनच होत नाही. परंतु या हल्ल्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न इस्राइलने करणे गरजेचे आहे.
या हल्ल्यानंतर लगेच इस्राइलने जणुकाही गाझात नरसंहार करण्याचा वीडाच उचलला. हमासचा हा हल्ला जणुकाही इस्राइलच्या पथ्थ्यावरच पडला. कारण त्याला गेल्या अनेक वर्षांपासून गाझावर जो काही क्रूर वरवंटा फिरवायचा होता, तो आता फिरवला जात आहे. हमासचा बहाणा करून एकदाचा गाझातील लोकांचा नरसंहार घडवायचा आणि आपले जलज्जहाल विस्तारवादी धोरण पुढे रेटायचे, याचा चंग त्याने बांधला आहे, त्यामुळेच की काय हाती आलेल्या माहितीनुसार इस्राइलने आतापर्यंत गाझावर २५ हजार टनांचा बाॅम्बवर्षाव केला आहे. तरीही अजून गाझातील निष्पाप नागरिकांच्या रक्ताची तहान इस्राइलची भागलेली नाही.
आता त्याहीपुढे जाऊन इस्राइलच्या राष्ट्रीय सरकारमधील काही मंत्री तर थेट गाझावर थेट अणुबाॅम्ब टाकण्याचा सल्ला देत आहेत. इस्राइल सरकारमधील अतिरेकी विचारांचे मंत्री हे तर इतके इरेला पेटले आहेत की, त्यांना गाझात असलेल्या लाखो लोकांपैकी प्रत्येकालाच ठार करण्याची एक अंतहीन तहान आहे. आज इस्राइल गाझातील नागरिकांच्या हत्येसाठी अक्षरशः वेडापिसा झालेला आहे. परंतु आपणच गेल्या अनेक वर्षांपासून पॅलेस्टीनींवर केलेल्या अनन्वित आणि नृशंस अत्याचाराचा हा परिपाक आहे, हे मानायलादेखील इस्राइल तयार नाही.
जणुकाही पॅलेस्टिनी हे इस्राइलमध्ये बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी एक तर या ठिकाणी राहूच नये किंवा त्यांनी दुय्यम नागरिकाचे जीणे जगावे, अशा भावनेतून इस्राइल गेल्या काही दशकांमध्ये वागत आहे. सध्याचे इस्राइलचे सरकार हे इतके तिखट आणि जहाल झालेले आहेत की, यित्सॅक रॅबीन आणि यासेर अराफात यांच्यात झालेल्या ओस्लो करारावर निर्घृणपणे हल्ला करून त्या कराराला रक्तबंबाळ करीत आहे.
यामध्ये इस्राइल आणि पॅलेस्टाईन या दोखांचीही आणखी एक महत्वाची शोकांतिका आहे. ती म्हणजे इस्राइलला म्हणावे तसे समर्थन जगभरातून मिळताना दिसत नाही. कारण जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये मानवतावादाची एक मोठी लहर या निमित्ताने पसरली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये निर्दोष पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ मोर्चाचा जनसागर रस्त्यावरून वाहत आहे. दुसरीकडे यानिमित्ताने पॅलेस्टाईनला समर्थन देण्याबाबत अरब राष्ट्रांमध्ये पडलेली मतभेदांची दरी स्पष्टपणे दिसून येत आहे.
इस्राइलकडून हजारो टन बाॅम्वर्षाव करून अक्षरशः अर्धा गाझा बेचिराख केल्यावरही आणि त्या ठिकाणी हजारो निष्पाप नागरिकांचे रक्ताचे पाट वाहल्यानंतरही अरब राष्ट्रांमध्ये म्हणावी तशी एकता दिसून आलेली नाही. गाझामध्ये तात्काळ युद्धविरामाची आवश्यकता असताना काही अरब राष्ट्रे बोटचेपी भूमिका स्वीकारत आहे. एकीकडे अमेरिका इस्राइलला युद्धाची भीषणता कमी करण्याचे पोकळ सल्ले देत आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती अॅन्टनी ब्लिंकन हे अरब राष्ट्रांमध्ये जाऊन त्यांना इस्राइलविरोधात युद्धात न उतरण्यासाठी विनवणी करीत आहेत. एखाद्या देशाचा दुटप्पीपणा यापेक्षा जास्त काहीही असू शकत नाही. यातून एकप्रकारे ब्लिंकन हे इस्राइलची फुकट वकिली करीत आहेत.
अमेरिका हा एकीकडे इस्राइलला युद्ध रोखण्याचे निर्देश देत आहे, तर दुसरीकडे गाझावर डागण्यासाठी त्यांना शस्त्रास्त्रदेखील पुरवत आहे. यावरून अमेरिकेचा कोडगा दुटप्पीपणा स्पष्टपणे उजागर होतो. जगभरात युद्धे होत रहावीत, गृहयुद्धांचा भडका उडत रहावा आणि दोन्ही बाजूंच्या लोकांना लढण्यासाठी आमची शस्त्र असावीत आणि एव्हढे सगळे करूनदेखील आम्हीच कशे लोकशाहीचे मूर्तिमंत पालक आहोत, असा बंडलबाजपणा अमेरिका जगभर करीत असतो. कारण त्यातूनच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बुलेट ट्रेनची गती मिळते.
निष्पापांच्या रक्ताचे सिंचन करून स्वतःच्या भांडवली नफ्याची शेती हिरवीगार करायची अन् वरतून मानवीय अधिकार आणि लोकशाही मूल्यांची हाकाटी पिटायची, असा दोगला खेळ अमेरिका गेल्या अनेक दशकांपासून खेळत आलेला आहे. अमेरिकेने आज अरब राष्ट्रांमध्ये दो फाड करून एकप्रकारे या ठिकाणी आपली वज्रमूठ आणखी मजबूत केली आहे. मात्र, निष्पापांच्या कत्तलीचे काय? आज गाझात घाऊक संख्येत माणसे मारली जात आहेत. लहान मुले, महिला, म्हातारी माणसं यांच्यासह पत्रकार, डाॅक्टर, नर्सेस, संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी यांचेही धडाधड मुडदे त्या ठिकाणी पडत आहेत. परंतु इस्राइल आज गेंड्याचे कातडे पांघरून बसलेला आहे.
इस्राइल बेधुंद होऊन गाझावर आग ओकत आहे. गाझातून धुराचे लोट, धुळीचे वादळ, नागरिकांच्या आक्रंदनाचा महापूर वाहत आहे. आज अर्धा गाझा मलब्यामध्ये परिवर्तीत झाला आहे. मेलेल्यांची गणतीच नाही की, जखमींची मोजदाद नाही. घायाळांचा इलाज नाही, औषधांचा पत्ता नाही, अन्न-पाण्याची परमोच्च भ्रांत, अशा महाभयंकर स्थितीत गाझातील लाखो नागरिक जीवन जगत आहेत. नरकापेक्षाही बदतर जीणं त्यांच्या नशिबी आलेलं आहे. या स्थितीमुळे जगातील कोट्यवधी नागरिकांच्या हृदयाला पाझर फुटला. नागरिक रस्त्यावर येऊन इस्राइलचा विरोध करीत आहेत. विशेष म्हणजे जगभरात अनेक ठिकाणी खुद्द यहुदी निदर्शने करीत आहेत व पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याची मागणी करीत आहे. परंतु नेतान्याहून आणि त्यांचे कडबोळे मंत्रिमंडळ हे पाषाणहदृदयी बनून बसले आहेत.
गाझातील नागरिकांनी सर्व आशा सोडून दिल्या आहेत. त्या ठिकाणी २४ तास मृत्यूची गडद छाया पसरलेली असते. कोणत्या क्षणी कुठून बाॅम्ब पडेल याची पुसटशीही कल्पना तेथील नागरिकांना नाही. बाहेर पडायला जागा नाही. चारही बाजूंनी कोंडल्या गेलेल्या मांजरासारखी अवस्था गाझातील नागरिकांची झालेली आहे. विलाप, रुदन, आक्रोश, आक्रंदन, संताप याच्या अनंत आणि अंतहीन लहरींचे राज्य सध्या संपूर्ण गाझा पट्टीवर पसरले आहे. परंतु या सगळ्या घटनांच्या अंताची कहाणी कुठेतरी लिहिणे आवश्यक आहे.
युक्रेनवर युद्ध लादल्याबद्दल पुतिन यांच्याना आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हेगार घोषित करण्यात आले. परंतु अद्यापही नेतान्याहू आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर असा कोणताही आरोप अमेरिकादी पाश्चात्य राष्ट्रांनी लगावला नाही. भांडवली सत्तांच्या गटारात बुडालेल्या अमेरिका-युरोपादी राष्ट्रातील सरकारांनी अंग झाडून या गटारातून स्वतःची सुटका करवून नाही घेतली, तर उतर मानवतावादाचा वैश्विक ज्वालामुखी फुटल्याशिवाय राहणार नाही. फक्त एव्हढेच की याची मोठी किंमत ही मानवतावादाला मोजावी लागेल.
- सुधीर देशमुख
संपादक, WebNews24
पुणे
email - deshsudhir2012@gmail.com
0 Comments