पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश जैस्वाल यांच्या पत्रकारितेच्या कार्याची दखल नुकतीच लंडन बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड ने घेतली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेतर्फे नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला.
मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील रहिवासी असलेले रमेश जैस्वाल हे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असून, येथेही त्यांनी आपल्या पत्रकारितेचा पिंड सोडला नाही. सद्यःस्थितीत ते दैनिक नवराष्ट्र व दैनिक राजदंड या वृत्तपत्रांचे औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण या भागात वार्तांकनाचे काम करतात. रमेश जैस्वाल हे गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आजवर विविध वृत्तपत्रांमध्ये काम केलेले आहे. त्यांनी आजवर केलेल्या अनेक बातम्यांची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली आहे.
जैस्वाल यांनी विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था, ग्रामीण भागातील पाणीसमस्या, वीज समस्या, सिंचनाची समस्या, गुरा-ढोरांच्या समस्यांना घेऊन वार्तांकन केलेले आहे. त्यांच्या पत्रकारिता कार्याची दखल लंडन बुक आॅफ आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डने घेतली. याबाबतचा पुरस्कार त्यांना नुकताच एका समारंभात प्रदान करण्यात आला.
हा सन्मान प्राप्त केल्याबद्दल माजी नगरसेवक अमोल बालवडकर,लहूजी बालवडकर, माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे, डॉ. सागर बालवडकर, राहुल बालवडकर, बुलडाणा अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक शिरीष देशपांडे यांनी रमेश जैस्वाल यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments