येत्या १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोरियन कला प्रदर्शनाचे आयोजन

*     कोरियातील ३० सुप्रसिद्ध चित्रकारांची कला अनुभविण्याची पुणेकरांना संधी

*     भारत- कोरिया राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विशेष प्रदर्शन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) आणि कोरियाचे के आर्ट इंटरनॅशनल एक्स्चेंज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवार १३ ऑक्टोबर ते रविवार १५ ऑक्टोबर दरम्यान विशेष कोरियन कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृह या ठिकाणी हे होणार असून सकाळी ११ ते सायं ६ या वेळेत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. सदर प्रदर्शनासाठी आर्ट पुणे फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायं ५.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृह या ठिकाणी होणार असून ते देखील सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. उद्घाटन कार्यक्रमासाठी के आर्ट इंटरनॅशनल एक्सचेंज असोसिएशनच्या अध्यक्ष हिओ सूक,

कोरियाचे कॉन्स्यूलेट जनरल किम योंग-ओजी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त राहुल महिवाल, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू प्रो. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे अध्यक्ष दिलीप बंड, फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रेखा मगर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगदाळे आदी मान्यवर उपस्थित असतील.

या चित्रप्रदर्शनीविषयी अधिक माहिती देताना डॉ राजेंद्र जगदाळे म्हणाले, “भारत आणि कोरिया हे दोन्ही देश व्यापार, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांसह विविध क्षेत्रांद्वारे मागील अनेक वर्षे एकमेकांशी निगडीत आहेत. कोरियन व भारतीय संस्कृती, खाद्यपरंपरा यांमध्ये देखील काही प्रमाणात साम्य आहे. यावर्षी भारत आणि कोरिया आपल्या राजनैतिक संबंधांची ५० वर्षे पूर्ण करीत असताना सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने या विशेष कोरियन कला प्रदर्शनीचे आयोजन केले आहे.

यामध्ये कोरियातील सुप्रसिद्ध ३० चित्रकारांचे तब्बल ८० मास्टरपिसेस पुणेकर रसिकांना अनुभविता येणार आहेत. हे सर्व चित्रकार यावेळी प्रदर्शनीदरम्यान उपस्थित असणार असून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही यावेळी रसिकांना मिळणार आहे.”

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील नागरिकांना या निमित्त कोरियन कलाकार आणि कोरियन संस्कृती यांची जवळून ओळख तर होईलच शिवाय आपल्या येथील कलाकारांना त्यांच्याशी कलात्मक संवाद साधता येईल याचा आनंद आहे. सदर प्रदर्शनात कला प्रकारांचे विविध प्रकार आणि शैली अनुभविता येणार असून यामध्ये अमूर्त, लँडस्केप, प्रभाववादी, समकालीन चित्र शैलींचा समावेश असेल. ही सार्व चित्रे तैल, जलरंग, ऍक्रेलिक, थ्री डी आणि संमिश्र माध्यमातील  असणार आहेत. कला संग्राहकांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरेल, असेही डॉ जगदाळे यांनी नमूद केले.

किम इनजून हे सदर कला प्रदर्शनाचे संचालक असून सचिन गुप्ता आणि पार्क सोयुंग हे क्युरेटर म्हणून काम पाहणार आहेत.

Post a Comment

0 Comments