मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक चालविणे ही मोठी जबाबदारी : पुणे मनपा अतिरिक्त
आयुक्त कुणाल खेमनार
पुणे : महामेट्रोमध्ये महिला चालक व अधिकारी पदावर मोठया प्रमाणात महिला कार्यरत आहेत. आज महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून विमान देखील चालवितात. महामेट्रो ही पुण्याची लाईफलाईन आहे. महामेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक यशस्वीपणे चालविणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मत पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात पुणे मेट्रो मध्ये कार्यरत महिलांचा विशेष सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी,
तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पटोदिया, राजेश सांकला, नारायण काबरा, निलेश लद््दड यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. महावस्त्र, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, मुळातच महिला या अष्टावधानी आहेत. अनेक आघाडयांवर एकाच वेळी महिला काम करतात. सगळ्या महिलांमध्ये ही कार्यशक्ती असते. ती जागृत करुन काम करायला हवे. प्रत्येक घर आणि व्यक्तीचे मन सांभाळण्याचे काम देखील महिला करत असतात, असेही त्यांनी सांगितले.
तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, मेट्रो शिवाय पुणे शहर पुढे वाटचाल करु शकत नाही. पुण्यात मेट्रो सुरु झाली याचा आम्हा सर्वांनाच आनंद आहे. मेट्रोसारखी सक्षम सार्वजनिक वाहतूक सुरळीतपणे चालवत पुणेकरांना सेवा देणे, हे येथील कर्मचा-यांशिवाय शक्य नाही. मेट्रोमध्ये नारी शक्ती देखील सर्वात पुढे कार्यरत आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला.
आम्हाला मेट्रो चालविताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. यापूर्वी आमच्यापैकी अनेकांनी गाडी देखील चालविली नाही. आता मात्र संपूर्ण प्रशिक्षण घेऊन मेट्रो चालवित आहोत. पुणेकरांना मेट्रोमधून प्रवास करण्याचा आनंद मिळवून देण्याकरिता सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, अशी भावना मेट्रो चालक व अधिकारी महिलांनी यावेळी व्यक्त केले.
0 Comments