'एमआयटी एडीटी' विद्यापीठाचा ६ वा दीक्षांत समारंभ; २८०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
पुणे : सध्या जगभरात वर्ण, जातिभेद यावरून आपण अशांतता माजल्याचे पाहतो. परंतू, दुसरीकडे भारत 'वसुदैव कुटूंबकम'चा जगाला संदेश देत आपल्या विविधततेतील एकतेमुळे भाषा, प्रांत आणि जातीपातीची बंधने तोडून देशात शांतता प्रस्तापित करताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या देशाची विविधता हिच आपले सामर्थ्य आहे, आणि सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्तापित करू शकतात, असे मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
ते तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोम, विश्वराजबाग येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या ६व्या दिक्षांत समारंभा प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, एमआयटी डब्लूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्रा.डाॅ.सुनिता कराड, सौ.ज्योती ढाकणे-कराड, पद्मश्री डाॅ.जी.डी. यादव, डाॅ.विनायक घसनीस, डाॅ.सुचित्रा नागरे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ,विरेंद्र शेटे यादी मान्यवर उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जिवनाशी व जिवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो. आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतीक प्रगतीही तितकीच महत्वाची असते. असेच मुल्याधिष्ठीत व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो आणि अशाच प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम या विद्यापीठाकडून घडत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच विश्वशांती प्राप्त होऊ शकते, तिच प्रस्तापित करण्यासाठी प्रा.डाॅ. विश्वनाथ कराड करत असणारे कार्य उल्लेखनिय आहे असे म्हणत, गडकरींनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या पाठीवर कौतुकाची थापही टाकली.
आपला शेतकरी आता ऊर्जा दाता बनला आहे. त्यामुळे, भविष्यात भारत हा ऊर्जा आयात करणारा नाही तर निर्यात करणारा देश ठरेल. तसेच, सर्व धर्माचा सन्मान करणे सध्या काळाची गरज आहे व त्यातूनच विश्वशांतीसाठीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. देशाला पुढे घेऊन जायचे असल्यास आपल्या संशोधनाला आणखी आघाडीवर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. इस्त्रोने भारताला अंतराळ संशोधनातील एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. इस्त्रो अंतराळ संशोधनात करत असलेले कार्यही देशासाठी प्रेरणादायी आहे, असे गडकरींनी यावेळी म्हटले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो), बंगळुरूचे माजी चेअरमन पद्मश्री. डॉ.ए.एस.किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, प्रा.डाॅ.मंगेश कराड म्हणाले की, पदवी प्रदान सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. ज्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा शेवट व उज्वल भविष्याची सुरवात होत असते. अशात यंदाचा ६वा दीक्षांत समारंभ 'एमआयटी एडीटी'साठी विशेषार्थाने गौरवाचा दिवस आहे. तरी या निमित्ताने सर्व पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन व भावी कारकिर्तीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. 'एमआयटी एडीटी'ने ने परीक्षेसाठी संपूर्ण डिजीटल प्रणाली अवलंबली असून, त्यामुळे निर्विघ्न परिक्षेची अंमलबजावणी, वेळेत अचून निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता खासियत बनली आहे.
याप्रसंगी बोलताना, पद्मश्री डाॅ.किरण कुमार म्हणाले, देशातील शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडवित असणाऱ्या एमआयटी एडीटी विद्यापीठाद्वारे डाॅ.कलाम यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्विकारणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे भारताने नुकतेच जगाला दाखवून दिले आहे. त्याचमुळे विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगूण देशाचे नाव वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. आपल्या देशात जगात कोणाकडेही नाही अशी प्रतिभावंत युवा पिढी आहे आणि याच युवा पिढीच्या खांद्यावर आता डाॅ.कलाम यांनी दाखवलेल्या प्रगत देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.
एकूण २८०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
राष्ट्रगीत व विश्वशांती प्रार्थनेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमात एमआयटी विद्यापीठातील २३ पीएचडी, ५१ सुवर्णपदके व १८८ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र यांसह एकूण २८०५ विद्यार्थ्यांना नितीन गडकरींच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी देशभरातून हजेरी लावली. तसेच यावेळी राज दंडासह काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणूकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विश्वशांती डोमला करण्यात आलेल्या आकर्षक रोषनाई विद्यापीठाचा परिसर उजळून निघाला होता. दीक्षांत समारंभाचे चेअरमन डाॅ.रामचंद्र पुजेरी यांनी आभार मानल्यानंतर पसायदानाद्वारे या कार्यक्रमाची सांगता झाली.
- एमआयटी-एडीटीचे विद्यार्थी घडवताहेत देशाचे भविष्य
एमआयटीने एक चांगला विद्यार्थ्यी घडविण्यासोबतच एक मुल्याधिष्ठीत मनुष्य जो आध्यात्म व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल असतो, असे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून आज पदवी मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनीही भारताच्या उज्वल भविष्यात आपला अनमोल वाटा द्यावा, असे मी त्यांना आवाहन करतो.
- प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड,
संस्थापक अध्यक्ष, माईर्स एमआयटी शिक्षण समुह, महाराष्ट्र
0 Comments