श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजन ; मंदिरावर आकर्षक भव्य सजावट
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता चितळे उद्योगसमूहाचे गोविंद चितळे व कुटुंबियांच्या हस्ते घटस्थापना झाली.
यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा 'सार्वजनिक नवरात्र उत्सव' महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा होत आहे.
धार्मिक कार्यक्रमांसोबतच पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रथमच महिला मेट्रो चालक व पदाधिका-यांचा सन्मान सोहळा तसेच भारताच्या चांद्र्रयान यशस्वी मोहिमेबद्दल महिला शास्त्रज्ञांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.
उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने महालक्ष्मी मंदिरात उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments