छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त
व विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त आयोजन
पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आणि विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे पुण्यात आगमन होत आहे.
दिनांक ३० सप्टेंबर रोजी शिवनेरीच्या पायथ्यापासून निघालेली ही यात्रा पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरून पुण्यात येत आहे. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी यात्रेचा समारोप होऊन जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री संजय मुद्राळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी परिषदेचे प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहप्रमुख नितीन महाजन, प्रांताचे कोषाध्यक्ष महेंद्र देवी , पूर्व पुणे विभागाचे मंत्री धनंजय गायकवाड उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण व्हावे, यासाठी शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० ऑक्टोबर रोजी यात्रा पुण्यात येऊन १४ ऑक्टोबर पर्यंत पुण्याच्या विविध भागात जाणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे शौर्य जागरण यात्रेचा समारोप होईल आणि सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होईल.
या सभेला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर.एन.सिंग, संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ प. श्री योगीराज महाराज गोसावी( पैठणकर) व भारतीय हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक उपस्थित राहणार आहेत.
शौर्य जागरण यात्रेदरम्यान सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सभा घेण्यात आल्या. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींनी केलेल्या पराक्रमाचे स्मरण यानिमित्ताने वेगवेगळ्या सभांमध्ये मांडण्यात आले. अनेक गावांमध्ये पारंपारिक ढोल ताशांच्या वाद्याने या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. दांडपट्टा फिरवणे तसेच विविध मर्दानी खेळ ठिकठिकाणी रथासमोर सादर करण्यात आले.
अनेक गावांमध्ये पुष्पवृष्टी करून सुवासिनींनी छत्रपतींच्या पुतळ्यांचे पूजन केले. पुणे शहरात कात्रज,पर्वती, सिंहगड रस्ता, कोथरूड ,औंध - पुणे विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर, येरवडा, लोहगाव ,मगरपट्टा सिटी हडपसर तसेच पुणे शहरातील सर्व पेठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा फिरणार आहे.
0 Comments