किराना संगीत गुरुकुलचे औपचारिक उद्घाटन संपन्न
मान्यवर कलाकारांच्या सुरमयी सादरीकरणाने रंगला उद्घाटनाचा सोहळा
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व उत्तम गुरुंकडून शिकण्याची सुवर्णसंधी आता शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे.
निमित्त आहे आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या किराना संगीत गुरुकुलचे. नुकतेच शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमात या गुरुकुलाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंद, मुकुंद संगोराम, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “कोणत्याही घराण्याचे प्रशिक्षण हे परीक्षा आणि सादरीकरण अशा दोन प्रकारांत देण्यात येते. या दोन्ही पद्धतींचा अंतर्भाव करीत किराना संगीत गुरुकुलमध्ये प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सदर प्रशिक्षणात संवादिनी (हार्मोनियम), तबला, सतार आणि बासरी आदी वाद्यांचे प्रशिक्षण इच्छुकांना देणार येईल.
या अंतर्गत वैयक्तिक प्रगतीकडे संपूर्ण लक्ष देण्यासोबतच अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेची तयारी करून घेणे, सादरीकरणाच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणे आदी बाबींवर देखील लक्ष केंद्रित करण्यात येईल.”
यानंतर किराना घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या अश्विनी मोडक यांचे गायन प्रस्तुत झाले. त्यांनी यावेळी राग पुरिया धनाश्री सादर केला. यामध्ये त्यांनी ‘कैसे आऊ मिलने पिया रे..’ ही रचना सादर केली. यानंतर त्यांनी राग देस मध्ये दादरा सादर केला. त्यांना गंगाधर शिंदे (संवादिनी), किशोर कोरडे (तबला) आणि आकांक्षा देसाई (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
धारवाड घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक व गायक उस्ताद रईस बाले खान यांचे सतार वादन यानंतर संपन्न झाले. त्यांनी राग जन संमोहिनी सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप जोड झाला याचे दमदार सादरीकरण केले. त्यांना किशोर कोरडे यांनी समर्थ तबलासाथ केली.
कार्यक्रमाचा समारोप भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाला. त्यांनी या वेळी राग यमन मध्ये ‘सुमरन तोरा तु करीम तू रहीम...’ ही विलंबित तीन तालातील बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी ‘मोरी गगरी नाव...’ हा ख्याल सादर केला. ‘बोली ना बोल...’ या भैरवीने त्यांनी आपल्या गायनाचा आणि कार्यक्रमाचा समारोप केला. गंगाधर शिंदे (संवादिनी), किशोर कोरडे (तबला) आणि विराज जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. जगदीश देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
0 Comments