एमआयटी-एडीटीमध्ये उत्साहात पार पडली नॅशनल इनडोअर रोईंग चॅम्पीयनशीप
पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या सहाव्या राष्ट्रीय इनडोअर रोईंग चॅम्पीयनशीपमध्ये सर्वाधिक पदकांची कमाई करीत हरियाणाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. यानंतर केरळने दुसरे तर आर्मी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाने तिसरे स्थान पटकावले. स्पर्धेनंतर विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
४०० हून अधिक रोअर्सचा सहभाग
चार दिवस प्रचंड प्रतिसादात पार पडलेल्या या सहाव्या इनडोअर नॅशनल चॅम्पीयनशिपमध्ये देशभरातील विविध राज्ये व रोईंग स्पोर्ट्स असोसिएशन्स मिळून २३ संघांनी सहभाग घेतला. यामध्ये अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते आसामपर्यंतच्या संघांचा समावेश होता. याशिवाय भारतीय थलसेना तसेच नौसेनेचेही संघ समाविष्ट होते. एकूण ४०० रोअर्सनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. रोईंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या मार्गदर्शनात स्पर्धा प्रचंड प्रतिसादात यशस्वीपणे पार पडली.
- हरियाणा प्रथम, तर केरळ द्वितीय स्थानी
या स्पर्धेत सर्वाधिक पदके हरियाणाने पटकावली. हरियाणाच्या संघाने ६ सुवर्ण, ३ रजत आणि ३ कांस्य पदके पटकावत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. यानंतर दुसऱ्या स्थानी केरळने बाजी मारली. केरळ ने स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रजत आणि २ कांस्यपदके पटकावली. तिसऱ्या स्थानावर आर्मी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाचा संघ राहिला. या संघाने २ सुवर्ण, ४ रजत व १ कांस्यपदक पटकावले. याशिवाय मेघालय, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि नेव्ह स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डानेही प्रत्येकी २ सुवर्ण पदके पटकावली. तामिळनाडू व पंजाबने एक-एक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला ३ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- रंगारंग उद्घाटन समारंभ
शनिवार १२ आॅगस्ट रोजी या स्पर्धेचे उद्घाटन एका रंगारंग कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स-एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड हे होते, तसेच अतिथी म्हणून आरएफआयचे सरचिटणीस एम. व्ही. श्रीराम, कोषाध्यक्ष नबाबुद्दीन अहमद, महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर आणि सरचिटणीस संजय वळवी यांच्यासह खजिनदार स्मिता शिरोळे यादव आदी उपस्थित होते.
खेळामुळे होते आत्मिक उन्नती - प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड
या वेळी बोलताना डाॅ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, खेळामुळे मनुष्याची मानसिक व आत्मिक उन्नती होते. खेळामुळे खेळाडूंमध्ये दुसऱ्यांप्रति प्रेम आणि आदरभाव तयार होतो. आज जगभरात बोकाळलेली अशांतता संपवण्यासाठी व अखिल विश्वात शांतता आणण्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्वपूर्ण योगदान देऊ शकते.
बक्षीस वितरण समारंभात जल्लोष
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. डाॅ. सुराज भोयर म्हणाले की, भारताला क्रीडा क्षेत्रात उच्चतम स्तरावर नेण्यासाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तराची क्रीडांगणे व पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत व विद्यार्थ्यांना डॉ. विश्वनाथ कराड स्पोर्ट्स अॅकॅडमीद्वारे उच्चमत सुविधा आम्ही देत आहोत. भविष्यात आम्ही मोठ्या प्रमाणात येथील विद्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये चमकताना दिसून येतील.
डॉ. विश्वनाथ स्पोर्ट्स अकादमीच्या कु. अनुष्का गर्जेने ज्युनियर मिक्स फोर प्रकारात कांस्यपदक जिंकून विद्यापीठाचे नाव उंचावले.
तज्ञांच्या मार्गदर्शनात पार पडली स्पर्धा
या स्पर्धेच्या आयोजन समिती महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर आणि त्यांच्या तज्ञ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा अचूक निकाल लावण्यात आला. या स्पर्धेसाठी पद्मश्री कॅप्टन बजरंगलाल तखर, सुभेदार मेजर इस्माईल बेग, कॅप्टन राजेंद्र शेळके, आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ, सुभेदार मेजर सवर्ण सिंग, छत्रपती अवॉर्ड पुरस्कृत स्पोर्ट्स डायरेक्टर प्रा. पद्माकर फड यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा आणखीन वाढवली. रोईंगच्या राष्ट्रीय स्पर्धेचे प्रभावी व सुंदर नियोजन केल्याबद्दल आरएफआयचे सरचिटणीस एम. व्ही. श्रीराम यांनी एमआयटी-एडीटी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
0 Comments