रुग्णांसाठी राबणाऱ्या हातांचा पुण्यात झाला सन्मान

अमनोरा येस फाउंडेशनतर्फे रुग्णसेविकांना  मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार प्रदान


पुणे : वैयक्तिक सुखदुःख विसरून रुग्णांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या आणि रुग्णांसाठी अहोरात्र राबणाऱ्या रुग्णसेविकांना  अमनोरा येस फाउंडेशनतर्फे  मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अमनोरा येस फाउंडेशनचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्या संकल्पनेतून गेल्या पाच वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ससूनचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ.शेखर प्रधान, डॉ. आरती किणीकर, वैद्यकीय उपअधिष्ठाता डॉ. सुनील भामरे, डॉ. सुजित धीवारे, हरीश ताठिया, अमनोरा पार्कटाउनचे उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी उपस्थित होते.

मालन चावरिया, नीता सारवान, मनीषा चौरे, उषा रणदिवे, गंगुबाई दळवी, शारदा सोलंकी या रुग्णसेविकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच रेणुका गोणे, पूजा नाईक आणि क्रांती गोरुले या विद्यार्थिनींना मीरा देशपांडे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

पुरस्काराला उत्तर देताना शारदा सोलंकी म्हणाल्या, आमच्या कामाची दखल अमनोरा येस फाउंडेशनने घेतली याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे यामुळे काम करण्यासाठी आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.

विद्यार्थिनी रेणुका गोरे म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची आमची ही सुरुवात आहे. अशावेळी अमनोरा येस फाउंडेशनने आम्हाला दिलेली मदत ही आमच्यासाठी निश्चितच महत्त्वाची आहे. यामुळे आम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यासाठी बळकटी येऊन आम्हाला निश्चितच यश मिळेल असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

विवेक कुलकर्णी म्हणाले,  अमनोरा येस फाउंडेशन खामगाव येथे पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी शाळा चालवत आहे. माळीण दुर्घटनाग्रस्त भागात फाउंडेशनने महत्त्वाची मदत केली होती. समाजामध्ये कोणीही आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून आणि विकासापासून दूर राहू नये ही फाउंडेशनची आणि अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांची भूमिका आहे, अशा विविध उपक्रमांमध्ये विविध समाज घटकांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करत आहोत.


Post a Comment

0 Comments