स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून बावधन परिसरात सैनिकांचे स्मारक व शिल्पाकृती यांची स्वच्छता करण्यात आली. स्वातंत्र्य दिन व कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला.
देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्य लढा, कारगिलचा लढा याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. दरवर्षी सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे विद्यार्थी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा दिवस कारगिल दिवस साजरा करतात.
१९९९ मध्ये कारगिलच्या पर्वत शिखरांवर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या स्थानावरून पाकिस्तानला हुसकावून लावल्यानंतर सैन्याने विजयोत्सव साजरा केला होता. सर्व अडचणींवर मात करत कारगिलमधून शत्रूच्या सैन्याचा पाठलाग करत त्यांना माघार घेणे भाग पाडल्यानंतर दुर्गम शिखरावर विजयाचा झेंडा फडकवला होता. देशाच्या त्या वीर सुपुत्रांच्या सन्मानार्थ शाळेने हा विशेष दिवस समर्पित केला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, प्राचार्य शीला ओक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
इयत्ता १० वीच्या वर्गातील कांची सखुजा आणि रुशदा हुद्दार या विद्यार्थिनींनी ऑपरेशन विजय मोहीमबद्दल प्रभावी सादरीकरण केले. ऑपरेशन विजय ही मोहीम भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ताब्यातून शिखरे सुरक्षित करण्यासाठी सुरू करत विजय मिळविला होता, याची माहिती त्यांनी सादर केली.
आर्जवी पाठक आणि आफिया काझी यांनी कारगिलवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित करण्यासाठी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि मूक अभिनय सादर केले. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती.
कारगिल युद्धावेळी लढाऊ विमाने संचलन केलेले माजी हवाई दल फायटर पायलट व मानसोपचार तज्ज्ञ ग्रुप कॅप्टन अश्विनी भाकू यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. ऑपेरेशन विजय, त्यामध्ये सहभागी अधिकारी आणि तेथील परिस्थिती याबद्दल त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे सादरीकरण केले.
भारतीय हवाई दलाच्या हवाई ऑपरेशन सफेद सागरच्या क्लिप दाखविल्या. कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांसारख्या सैनिकांनी केलेले शौर्य बलिदान त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. भारताप्रती असलेले उत्तम नागरिक म्हणून कर्तव्य त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, "विविध उपक्रमांद्वारे सूर्यदत्त विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. अभ्यासक्रम, राष्ट्रगीत आणि वंदे मातरमचे गायन व्यतिरिक्त विविध कृतीतून देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करते. राष्ट्राबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होईल, यासाठी प्रयत्नशील असते."
0 Comments