‘दुविधा’ या लघुपटाचे पुण्यात प्रदर्शन संपन्न

अवयवदान जनजागृती व अवयव तस्करी विषयावर भाष्य करणाऱ्या 


पुणे : आज भारत हा जगात सर्वाधिक अवयदान करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आपल्या एकूण लोकसंख्येच्या ०.०१% इतकेही नागरिक आज अवयवदान करीत नाहीत त्यामुळे अवयवदाना संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने अवयवदानाचे महत्त्व विषद करणारा व अवयव तस्करी (ऑर्गन ट्रॅफिकिंग) या विषयावर भाष्य करणारा ‘दुविधा’ हा लघुपट आज प्रदर्शित झाला.

राहुल पणशीकर दिग्दर्शित सदर लघुपटाचे प्रदर्शन आज विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी संपन्न झाले. राहुलस् ग्राफिक्स या संस्थेच्या वतीने या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, विपणन व ब्रँडिंग प्रमुख पीयूष श्रीवास्तव यांसोबतच लघुपटातील कलाकार गिरीश परदेशी, अपर्णा मेनन, शीतल राऊत, राध्येय कापरे, सुजित देशपांडे, निखील जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनीही या लघुपटात भूमिका साकारली आहे.

राहुल पणशीकर यांनी या आधी प्रदर्शित केलेल्या ‘राख’ या चित्रपटाचा पुढचा भाग असलेल्या ‘दुविधा’ या लघुपटात अवयवदानाची गरज असलेल्या एका कुटुंबियांची व्यस्था दाखविण्यात आली आहे. हे कुटुंब कशा प्रकारे आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी अवयव तस्करीच्या मार्गाकडे वळते, मात्र नंतर चूक लक्षात आल्यावर त्यांना आलेला सुखद अनुभव, समाजातील अवयवदानाविषयीच्या जनजागृतीची परिस्थिती, त्याची असलेली गरज आदी विषय या लघुपटात हाताळण्यात आले आहेत. कुटुंबातील व्यक्तीला एखाद्या अवयवाची गरज असताना पैशांची श्रीमंती असूनही आलेली हतबलता लघुपटात दाखविण्यात आली असून ती मनाला भिडते.

यावेळी मुलांच्या हृदय प्रत्यारोपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अभिजित केळकर यांनी त्यांना आलेला अनुभव आणि कुटुंबियांची अवस्था या वेळी उपस्थितांसमोर मांडली. अवयवदान जागृती सोबतच रुग्णालयांची सज्जता आणि परिचारिका व तांत्रिक स्टाफची कुशलता यासंदर्भात आलेले आपले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.

समाजातील सर्वांनी एकत्र येत अवयवदानासंदर्भात जागृती करावी ही काळाजी गरज असल्याचे मत यावेळी पियुष श्रीवास्तव यांनी मांडले. राहुल पणशीकर यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आभार मानले.  

क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राचे (झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डीनेशन सेंटर) प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. लघुपट पाहिल्यानंतर अनेक जणांनी अवयवदानाच्या अर्जांची मागणी करीत ऑनलाईन अर्ज भरले.

Post a Comment

0 Comments