एमआयटी-एडीटीचा आठवा वर्धापनदिन उत्साहात साजरा, मान्यवरांची उपस्थिती
पुणे : सध्या भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. परंतु गेल्या 75 वर्षांत भारताने जी काही प्रगती केली त्यामागे विविध क्षेत्रातील संशोधकांचा मोठा हात आहे. भविष्यातही भारताला प्रगतीच्या वाटेने नेण्यासाठी संशोधकांची मोठी फौज लागणार आहे. याचीच जाणीव ठेवून एमआयटी-एडीटी विद्यापीठ आपल्याकडे नवनवीन संशोधक तयार करीत आहेत. हे संशोधक उद्याचा भारत घडवतील, अशी अपेक्षा इस्त्रोचे माजी संचालक तथा पद्मश्री डाॅ. प्रेम शंकर गोयल यांनी व्यक्त केली.
लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा आठवा वर्धापनदिन शुक्रवार 11 आॅगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रेमशंकर गोयल बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माईर्स-एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड हे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून नॅशनल केमिकल लेबाॅरेटरीचे मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. आशीष लेले, मॅरेक्स मिडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. कमल चढ्ढा डीन. सुदर्शन सानप, डीन मोहीत दुबे, यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अनोख्या डू-बाॅट मशीनचे अनावरणाने करण्यात आले.
या प्रसंगी एमआयटी-एटीडी विद्यापीठासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी प्रा. धीमंत पांचाळ यांना लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. मोहित दुबे यांना लीडरशीप एक्सलंस अवाॅर्ड देण्यात आला. याशिवाय विविध पुरस्कारंचे वितरण करण्यात आले.
प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड या वेळी म्हणाले की, विज्ञानाने मानवाच्या जीवनात मोठी प्रगती घडवून आणली आहे. परंतु आज जगभरात बोकाळलेली अशांती आणि हिंसाचार संपवायचा असेल तर विज्ञानाला आध्यात्माची जोड आवश्यक आहे. हीच गरज ओळखून आम्ही एमआयटी-एडीटीच्या भव्य आवारात विश्वशांती डोम निर्माण केला याच आवारात आम्ही विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालणारी एक प्रयोगशाळादेखील स्थापित केली आहे.
या विद्यापीठातून उच्चशिक्षित होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक व आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग विश्वाची प्रगती व शांततेसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी बोलताना डाॅ. चढ्ढा म्हणाले की, आयुष्यात यश हे सातत्याने मिळवत राहिले पाहिजे. पहिल्या यशानंतर आपण थांबता कामा नये. असे झाल्यास कोणताही मनुष्य जीवनात सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे यशाकडे विद्यार्थ्यांनी सातत्याने मार्गक्रमण करावे. आयुष्यात अनेक वादळे येतील परंतु प्रत्येक वादळांचा कठोरपणे मुकाबला करण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वात लवचिकपणा आणा. यातूनच तुम्हाला यशाचा खरा मार्ग कळेल.
0 Comments