पुणे : ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बाबतीत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला सातत्याने डावलण्यात येत आहे. पुरस्कार निवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बैठकीस क्रीडा तज्ज्ञ तर सोडा क्रीडा मंत्रीही उपस्थित नव्हते. यामुळे गुणवत्ता असूनही आम्हाला डावलण्यात आले,’ अशी तक्रार विविध खेळातील खेळाडूंनी केली.
या संदर्भात १४ जुलै रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगांवकर यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना पत्र लिहून ही माहिती दिली असल्याचेही या खेळाडूंनी सांगितले.
विराज परदेशी (मॉडर्न पेंटाथलॉन), गणेश नवले, केतकी गोखले, जान्हवी वर्तक, राधिका धरप (जिमनास्टिक), विराज लांडगे (कब्बड्डी),ऋषिकेश अरणकल्ले व इतर (मल्लखांब), कल्याणी जोशी (वूशु), कोमल किर्वे, राजेश्री गुगळे (जलतरण, वॉटरपोलो) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराबाबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला.
विराज परदेशी म्हणाले, ‘पुरस्कारासाठी नजिकच्या काळातील तीन वर्षातील कामगिरी लक्षात घेतली जाते. या वेळी कोरोनाचा अडथळा होता. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन देशभरात या वर्षासाठी सर्वांना सवलत देण्यात आली. मग, आपल्याकडे का नाही.
यानंतरही दोन वर्षांतच खेळाडूंनी १६ पेक्षा अधिक गुणांकन मिळविले आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला. आम्हा सर्व खेळाडूंना राज्य संघटनेचा पाठिंबा असून, लढाई लढण्यासाठी मान्यता आहे. क्रीडा व युवा सेवा संचानलयातील बरेच अधिकारीही आमच्या बरोबर असून, ते प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांना घाबरून समोर येत नाही.’
केतकी गोखले म्हणाल्या, ‘यंदाच्या पुरस्कारांबाबत क्रीडा आयुक्तांनी सातत्याने क्रीडा मंत्र्यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. क्रीडा मंत्र्यांनी पुरस्कारांबाबत बैठक घेण्यास सांगितले, तर क्रीडा आयुक्तांनी संपूर्ण पुरस्कार पद्धतीने नव्याने राबवावी लागेल असे सांगून बैठक टाळली. शिवछत्रपती पुरस्कारासाठी ९०० अर्ज आले असताना २५०० अर्ज आल्याची खोटी माहिती त्यांनी दिली आणि आम्ही महाराजांच्या नावाने पुरस्कार देतो, खिरापत वाटत नाही, असे वक्तव्य केले होते.’
अनिल चोरमले आणि सुहास पाटील या दोन्ही अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचे गुन्हे आहेत. बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यात चोरमलेंना अटकदेखील झाली होती. सुहास पाटील यांच्यावर १ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर पैसे घेऊन पुरस्कार दिल्याचा गुन्हादेखील दाखल आहे. असे अधिकारी खेळाडूंची पुरस्कार पडताळणी कसे करु शकतात, करत असतील, तर तो खेळाडूंच्या मेहनतीचा अपमान असल्याचे आम्ही मानतो, असे विराज लांडगे यांनी सांगितले.
मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाच्या पडताळणीबाबत डेस्क ऑफिसर बालाजी केंद्रे यांनी, म्हाळुंगे- बालेवाडी स्टेडियमच्या आवारात तुला शासनाची ताकद दाखवतो अशी धमकी दिल्याचे विराज परदेशीने सांगितले. कारकिर्दीत मी क्रीडा प्रबोधिनीतील अनेक खेळाडूंना हरवल्यामुळे माझ्यावर खुन्नस काढली जात आहे. राज्य संघटनेकडून पत्र दिले गेल्यानंतरही २०१९-२०, २०२०-२१ अशा दोन वर्षांसाठी मला चुकीचे गुण देण्यात आले असेही विराज म्हणाला.
क्रीडा क्षेत्रासाठी कोविड्च्या काळातील क्रीडा प्राधिकरणाचे सवलत पत्र उपसंचालक चोरमले यांना सादर केले, तेव्हा त्यांनी क्रीडा प्राधिकरणाचा (साई) महाराष्ट्रात काय संबंध असे वक्तव्य केल्याची तक्रार मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक खेळाडूंनी केली.
क्रीडा आयुक्त सुहास दिवसे हे तुघलकशाही पद्धतीने काम करत असून, क्रीडा आयुक्त म्हणून खेळ, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांना संपविण्याचे काम केले जात असून, इथे बसलेले सर्व खेळाडू स्व-खर्चाने मोठे झाले आहेत. हे त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत असे खेळाडूंनी यावेळी सांगितले.
0 Comments