एमआयटी-एडीटीमध्ये नेत्रदीपक चांद्रयान-3 प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित

प्रक्षेपण कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती


पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात शुक्रवार 14 जुलै रोजी नेत्रदीपक चांद्रयान-3 प्रक्षेपण कार्यक्रमाचा उत्साही वातावरणात आनंद घेतला. 

विद्यापीठातील `लगर फाल्कन एरो क्लब` आणि विद्यार्थी व्यवहार व कल्याण विभागाच्या सहकार्याने `सेलिब्रेटिंग इंडियन स्पेस ओडिसी` कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला 200 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

भारताची तिसरी चंद्र मोहीम `चांद्रयान-3` च्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी उड्डाण करतानाचे ऐतिहासिक प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी `याची देही, याची डोळा` पाहिले. MIT-ADT विद्यापीठाला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथील प्रतिष्ठित शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन आजवर सातत्याने मिळत आलेले आहे.  

इस्रोचे विद्यमान अध्यक्ष एस. सोमनाथ, पद्मविभूषण जी. माधवन नायर, पद्मश्री ए. एस. किरण कुमार आणि पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन यांनी विविध प्रसंगी आणि समारंभांदरम्यान एमआयटी-एडीटीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलेले आहे.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, इस्रो, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिमोट सेन्सिंग, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, आणि IISST यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय योगदान देऊन, एरोस्पेस क्षेत्रात आपल्या विद्यापीठाची मान उंचावली आहे.

एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुनील डिंगरे, विद्यार्थी व्यवहार व कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुराज भोयर, फॅकल्टी मेंटॉर प्रा.कृष्णा जाधव, आणि एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी, एरोस्पेसबद्दलच्या त्यांच्या उत्कटतेने प्रेरित होऊन, भारताच्या अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नांचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुकतेने भाग घेतला. भारताच्या अंतराळ संशोधनातील शास्त्रज्ञांच्या आजवरच्या प्रयत्नांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली.

Post a Comment

0 Comments