अक्षर मानव ग्रुपच्या चित्रपट विभागाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे - समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणाऱ्या अक्षर मानव ग्रुपच्या चित्रपट विभागाच्या वतीने अक्षर मानव शाॅफी ओटीटी प्लॅटफाॅर्मची सुरवात करण्यात आली असून, यावर सर्वांत आधी शाॅर्ट फिल्म बनवणाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे शाॅर्ट फिल्म बनवणाऱ्यांसाठी हा प्लॅटफाॅर्म सर्वोत्तम आहे, असे प्रतिपादन अक्षर मानव फिल्म विभागाचे प्रमुख प्रवीण जावळे यांनी केले.
या विषयासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार भवनात एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी प्रवीण जावळे, बोलत होते. या वेळी अक्षर मानव ग्रुपचे परेश गांधी, प्रमोद काळे आदी उपस्थित होते.
अक्षर मानवच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले की, आमच्या ग्रुपच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी अनेक विधायक उपक्रम राबवले जात असतात. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अक्षर मानवच्या चित्रपट विभागाच्या वतीने हा ओटीटी प्लॅटफाॅर्म सुरू करण्यात आला आहे.
यात शाॅर्ट फिल्मला चांगला वाव मिळावा, यासाठी आम्ही एक स्पर्धा घेत आहोत. सध्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद प्राप्त होत आहे. २० जुलै ही शाॅर्ट फिल्म पाठवण्याची शेवटची तारीख आहे. स्पर्धेचा कालावधी हा दि. २१ जुलैपासून ९० दिवसांचा असेल.
या ९० दिवसांमध्ये ही शाॅर्ट फिल्म किती प्रेक्षक पाहतात, त्यावर त्या शाॅर्ट फिल्मला स्पर्धेत क्रमांक दिले जाईल व प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच या शाॅर्ट फिल्मला पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत पहिली येणाऱ्या शाॅर्ट फिल्मला 11,111₹ दुसऱ्या फिल्मला 7,7 77₹ तिसऱ्या फिल्मला 5,555₹ आणि चौथ्या शॉर्ट फिल्मला 3,333₹ अशी बक्षिसाची रक्कम आहे.
त्याचबरोबर यामध्ये एक स्पेशल ज्युरी अवॉर्ड देण्यात येणार आहे त्याची रक्कम 5000 असेल. हा प्लॅटफॉर्म शॉर्ट फिल्म निर्मात्यांना कमर्शियल पद्धतीने एक अर्थार्जनाचे माध्यम उपलब्ध करून द्यावे म्हणून अक्षर मानव ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती अक्षर मानवच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
अधिक माहितीसाठी अक्षर मानवच्या www.aksharmanav.com या वेबसाईटला किंवा amaaksharmanav@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन अक्षर मानव ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments