अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ,
डाॅ. बाबा आढाव, संजय आवटे यांना पुरस्कार
पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा १४ ते १८ जुलै २०२३ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर, अबोली सुपेकर आदी उपस्थित होते. निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, उद्योग भूषण पुरस्कार युवराज ढमाले कॉर्प चे संचालक युवराज ढमाले, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार,
धार्मिक भूषण पुरस्कार श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव चे प्रमुख विश्वस्त प्रकाश देवळे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,फळांची करंडी, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणा-या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत.
तसेच यावेळी महिला बचतगट स्पर्धा पारितोषिक वितरण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या हस्ते होईल. महिला बचत गट स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. मंडई बुरूड आळीतील मुख्य मंदिरासमोरील उत्सवाची सुरुवात शुक्रवार (१४ जुलै) रोजी सायंकाळी ७ वाजता पुणे शहरातील गरजवंत तृतीय पंथीयांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, आमदार रवींद्र धंगेकर, रांका ज्वेलर्स चे संचालक ओमप्रकाश रांका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आकर्षक पुष्पसजावट करण्यात येणार आहे. याशिवाय रुद्राभिषेक, रुद्रयाग, भजनसेवा, ढोल-ताशा पथक वादन असे दैनंदिन कार्यक्रम होतील.
शनिवारी (१५ जुलै) सायंकाळी ७ वाजता वंचित विकास संस्थेतील मुलांना ५१ हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात येणार आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव उपस्थित राहणार आहेत. तसेच, रविवारी (१६ जुलै) सायंकाळी ७ वाजता गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या वाटप होणार आहे. यावेळी आमदार योगेश कदम, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच संपूर्ण उत्सवात युवराज छत्रपती संभाजी राजे, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, आमदार महेश लांडगे, प्रवीण मसालेवाले चे संचालक विशाल चोरडिया, बालन ग्रुप चे चेअरमन पुनीत बालन, कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा होणार आहे.
दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव
सोमवार, दिनांक १७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments