MIT-ADT विद्यापीठातर्फे कॅम्पस ते मल्हारगडापर्यंत सायकलिंग उपक्रम

व्यसनांच्या विरोधात जागरूकतेसाठी नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत केले सायकलिंग व ट्रेकिंग

 


पुणे - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयाने 'नशामुक्त भारत अभियाना' अंतर्गत शनिवार २३ जुलै रोजी कॅम्पसपासून ते ऐतिहासिक मल्हारगडापर्यंत सायकलिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. सुराज भोयर यांच्या नेतृत्वात आयोजित या उपक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मल्हारगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी ट्रेकिंगचा आनंद घेतला. 

अधून-मधून रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरींचा आणि घाटातील मनमोहक दृश्यांचा आनंद घेत डाॅ. भोयर यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी हे पुण्यातून सायकलने मल्हारगडाकडे निघाले. वाटेत दिवेघाटाची कठीण चढाई होती, परंतु निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या वातावरणातील आल्हाददायकतेने सर्वांमध्येच अनोखा उत्साह संचारला होता. एमआयटी-एडीटी विद्यापीठ कॅम्पस ते मल्हारगडापर्यंत व तेथून परत असा ५५ किलोमीटरचा हा सायकलिंग उपक्रम होता.

मल्हारगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्व जण ट्रेकिंग करत गडावर पोहोचले. गडावर पोहोचल्यानंतर दूरवर पसरलेली हिरवाई पाहून आणि रिमझम पावसाच्या वर्षावाने सर्वांचाच थकवा नाहीसा झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपतींच्या कार्याला उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी या वेळी मल्हारगड व परिसरात स्वच्छताही केली.

या उपक्रमासंदर्भात बोलताना प्रा. डाॅ. सुराज भोयर यांनी सांगितले की, आज देशातील युवकांमध्ये व्यसनांविषयी जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तसेच आपले आरोग्य उत्तम रहावे, यासाठी सायकलिंग अत्यंत जरुरी आहे. दुसरीकडे आपला ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वास्तुंविषयी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती प्राप्त व्हावी, यासाठी या सायकलिंग व मल्हारगडावर ट्रेकिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments