ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाला नॅकचे 'ए प्लस' मानांकन


पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाला नॅक समितीकडून दुसऱ्या फेरीमध्ये 'ए प्लस' मानांकन प्राप्त झाले. बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) समितीतर्फे महाविद्यालयाची नुकतीच पाहणी करण्यात आली.

दोन दिवस या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांचे शैक्षणिक उपक्रम, भौतिक सोयी-सुविधा, नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासकीय बाबी, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली होती.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असावे, असे केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव यांचे ध्येय आहे. ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालय हे सन २०१० पासून सुरु झाले असून, आजपर्यंत अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी हे यशस्वी उद्योजक असून प्रशासकीय सेवेत व प्रतिष्ठित उद्योगातही अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.

केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाच्या यशाबद्दल कल्याणराव जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव-देशमुख, कार्यकारी संचालक मेजरल जनरल (नि.) समीर कल्ला यांनी प्राचार्य डॉ. निलेश ऊके, समन्वयक प्रा. डॉ. सतीश देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

डॉ. निलेश उके यांच्या कुशल नेतृत्वात महाविद्यालय प्रगती करत असून, विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही संशोधनात्मक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती, सर्वाना मुक्तपणे काम करण्याची संधी देण्यातील त्यांचा पुढाकार महत्वाचा ठरत आहे, अशा शब्दांत जाधव यांनी प्राचार्यांचे कौतुक केले. 



Post a Comment

0 Comments