भारताच्या आर्थिक विकासात पुण्याची भूमिका महत्त्वपूर्ण

शारजाह एअरपोर्ट इंटरनॅशनल फ्री झोनच्या अधिकाऱ्यांचे प्रतिपादन


पुणे : भारत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीमध्ये पुणे शहराची भूमिका ही महत्त्वपूर्ण असून शारजाह एअरपोर्ट इंटरनॅशनल फ्री झोन (एसएआयएफ झोन) पुणे शहरातील व्यावसायिकांना विस्तारासाठी आवश्यक असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कायमच मदत करेल, असे आश्वासन एसएआयएफ झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्या दरम्यान दिले.

युएई आणि भारत या दोन देशात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (कॉम्प्रिहेन्सिव्ह इकोनॉमिक पार्टनरशिप अॅग्रीमेंट- सीईपीए) करण्यात आल्या नंतर पुण्यातील क्रेसेंडो वर्ल्डवाईड प्रा. लि या संस्थेच्या पुढाकाराने एसएआयएफ झोनचे वरिष्ठ अधिकारी पुणे भेटीवर आले होते. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी युएई येथे व्यवसाय विस्ताराच्या संधींवर पुण्यातील उद्योजकांशी समोरासमोर चर्चा केली.

यावेळी बोलताना एसएआयएफ झोनच्या विक्री विभागाचे उपसंचालक अली मोहम्मद अलमुतावा म्हणाले, “मुंबईनंतर पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात पुण्याची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे.

याबरोबरच अलिकडच्या काळात माहिती तंत्रज्ञान (आयटी), अभियांत्रिकी आणि ऑटोमोटिव्ह कंपन्यांसह पुणे हे एक स्टार्टअप हब बनले आहे, येथे अनेक लहान, मध्यम व मोठे उद्योग जागतिक स्तरावर त्यांचा व्यवसाय वाढवू पाहत आहेत.

हेच लक्षात घेत एसएआयएफ झोन व शारजाह सरकारी प्राधिकरण या उद्योगांना युएईमध्ये एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत.” एसएआयएफ झोनच्या प्रतिनिधीमंडळाला मिळालेला प्रारंभिक प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता. युएई हा व्यापारासाठी सर्वांत सुरक्षित देश असून आम्ही देखील सहज व सुरक्षित व्यापाराच्या दिशेने पाऊल टाकत असताना आवश्यक दस्तऐवज व सहाय्यक धोरणांचा विस्तार करताना आशादायी आहोत, असेही या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

या भेटीची पुढील पायरी म्हणून येत्या महिन्यात पुण्यातील काही निवडक कंपन्यांचे शिष्टमंडळ हे एसएआयएफ झोन, शारजाह, युएईला भेट देणार असल्याची माहिती क्रेसेंडोचे संचालक अतुल काळुस्कर यांनी दिली.    

एसएआयएफ झोनमध्ये गुंतवणुकीचे विविध फायदे असून यामध्ये संपूर्ण जागतिक बाजारपेठेतील प्रवेश व फ्री झोन कंपन्यांमधील गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्हिसा यांचा समावेश असल्याचेही एसएआयएफ झोनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments