गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी दिला 'स्वच्छ पुणे' चा नारा

शहराच्या मध्यवर्ती भागातील ३०-३५ मंडळाचा सहभाग; घरोघरी करणार जनजागृती

गणेशोत्सव मंडळे, महापालिका घनकचरा विभाग आणि पोलिस यांची बैठक संपन्न


पुणे : स्वच्छतेच्या बाबत पुण्याला संपूर्ण देशात अव्वल आणण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यानी केला आहे. यासाठी प्रत्येक घरात जाऊन स्वच्छतेच्या बाबत जनजागृती करणार असून घर, आस्थापना  स्वच्छ ठेऊन बाहेर कचरा करणे ही मानसिकता बदलण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील ३०-३५  गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिर येथे गणेश मंडळाचे कार्यकर्ते, महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. पुण्याला स्वच्छतेच्या बाबत देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा सहभाग या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहर स्वच्छतेमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त आशा राऊत, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने दादासाहेब चुडाप्पा, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडित, स्वच्छ संस्थेचे हर्षद बर्डे, केतकी घाटगे, सतीश जयरामन, स्वच्छ व जनवाणीचे प्रतिनिधी आणि शहरातील ३० ते ३५ गणेशोत्सव  मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आशा राऊत म्हणाल्या, शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढते. यासाठी ८ हजार स्वच्छता कर्मचारी दिवस रात्र काम करतात. तरी अनेक ठिकाणी कचऱ्याच्या समस्या आहेत. घर, आस्थापने स्वच्छ ठेऊन बाहेर कचरा करणे ही मानसिकता बदलायला हवी. रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग न करता गाडीत कचरा द्या. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरीकांचा सहभाग हवा आणि तो वाढविण्यासाठी गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करुन सहकार्य करावे.

संदीपसिंह गिल म्हणाले, पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे अपेक्षित सहकार्य करु. स्वच्छतेच्या बाबत लोकांची मानसिकता बदलायला हवी. बदल कायमस्वरुपी असेल तर नक्कीच बदल घडेल. यंदाच्या गणेशोत्सवाची संकल्पना पुणे स्वच्छ अभियान अशी ठेवली तर नक्कीच मोठा प्रभाव पडेल.

अण्णा थोरात म्हणाले, मोठ्या प्रमाणात गणेश मंडळे शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. आणि याच भागात कचऱ्याची समस्या देखील मोठी आहे. सर्व गणपती मंडळांनी सहकार्य आणि नागरिकांमध्ये जनजागृती केल्यास शहर स्वच्छतेच्या बाबत नक्कीच अव्वल असेल,

महेश सूर्यवंशी म्हणाले, स्वच्छतेच्या बाबतीत पुणे शहर पुन्हा क्रमांक एकवर यायला हवे. पुणे महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतेच, परंतु काही त्रुटी राहतात. या त्रुटी पूर्ण करण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढे यायला हवे. 

समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत हे कार्यकर्ते पोहोचू शकतात आणि त्यांनी  जनजागृती केल्यास नक्कीच पुणे शहर स्वच्छतेच्या बाबत पहिल्या क्रमांकावर असेल.

Post a Comment

0 Comments