निळू फुलेंसारखा व्यक्तिमत्त्वातील साधेपणा जपणे कठीण : सचिन खेडेकर

सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांना डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते निळू फुले

सन्मान प्रदान


पुणे : निळू फुले हे मोठे कलाकार होतेच. आजही ते आमच्यासाठी एक रसायनच आहेत. त्यांच्यासारखा मोठा नट होण्याचा प्रयत्न मी आजही करतोय. मात्र आजच्या परिस्थितीत त्यांच्यासारखा साधा माणूस होणं, तो साधेपणा आपल्या व्यक्तीमत्वात जपण हे खरोखर कठीण आहे. त्यांच्यासारखं सामाजिक भान जपत काम करण्याचा मी कायम प्रयत्न करेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले.

एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून आयोजिलेल्या कलारंग महोत्सवात अभिनेते सचिन खेडेकर यांचा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते निळू फुले सन्मानाने गौरव करण्यात आला त्या वेळी सचिन खेडेकर बोलत होते.

बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर, अजित बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या व अभिनेत्री गार्गी फुले थत्ते, जावई ओंकार थत्ते, राजेश दामले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मानचिन्ह, गांधी टोपी, उपरणे, निळू फुले यांवरील पुस्तक आणि रोख रुपये २१ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

आज बाबांच्या अर्थात निळू फुले यांच्या नावाने सचिन खेडेकर यांचा सन्मान होतोय याचा आनंद आहे असे सांगत गार्गी फुले थत्ते म्हणाल्या, ' बाई वाड्यावर या...' या एका संवादापलीकडाचा बाबा नव्या पिढीला एक नट म्हणून, एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून समजावा, तो विस्मरणात जाऊ नये या उद्देशाने आम्ही हा सन्मान सुरू करीत आहोत. चरित्र अभिनेत्याल फारसा सन्मान मिळत नाही ही खंत आजवर होती या निमित्ताने हे होतंय याचा आनंद आहे."

कलाकार म्हणून आज मागे वळून पाहताना छान वर्गीकरण करता येईल. मी जेव्हा अभिनेता म्हणून काम करत असतो तेव्हा ठरवून काही होत नसतं या प्रवासात मी केलेली निवड, मला भेटलेली माणस हेच माझे संचित आहे असे सांगत सचिन खेडेकर म्हणाले, "अभिनेत्याला मिळालेला पैसा महत्त्वाचा नसतो कारण तो खर्च होत असतो. पण रसिकांच्या मिळालेल्या प्रतिक्रिया या जास्त महत्त्वाच्या असतात. म्हणूनच खरेतर प्रतिक्रियांचे चेक लिहिले गेले पाहिजे. ती संपत्ती साठवून ठेवता आली पाहिजे असे मला कायम वाटते."

निळूभाऊ यांना त्यांच्या स्वभावाच्या विरोधात भूमिका मिळाल्या मात्र त्यांनी प्रत्येक भूमिकेत वेगळाच रंग भरला आहे. गांधी टोपी घालत असताना जे पाहिलं वाक्य त्यांच्या तोंडून यायचं त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व समजते असे सांगत डॉ जबार पटेल यांनी निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ पटेल पुढे म्हणाले, "निळू फुले हा माणूस फार मोठं काहीतरी करणार आहे हे डॉ श्रीराम लागू मला कायम म्हणायचे. त्यांच्यासोबत काम करताना समोरचा नट प्रचंड सावध असायचा असा त्यांचा वचकच होता. पण इतकेच नाही तर त्यांची विचारांची बैठक देखील पक्की होती."

कलाकाराला स्वतः ची वैचारिक भूमिका असते का असावी का याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे निळू फुले असे सांगत निळू फुले यांनी सिंहासन चित्रपटातील दिगु टिपणीसच्या भूमिकेत केलेल्या चित्रपटाचा शेवट डॉ पटेल उलगडून दाखविला.

"निळू फुले यांनी त्यांच्यातील अभिनेत्याच्या मर्यादेपलीकडे जात ही भूमिका साकारली आहे. हा माझ्या शब्दांच्या पलीकडे गेला", असे स्वतः विजय तेंडूलकर मला म्हणाले असल्याचे डॉ पटेल यांनी आवर्जून नमूद केले.त्या काळच्या राजकारणावर निळू फुले यांनी केलेली व्यंगात्मक टिपणी ही त्यांच्याच व्यक्तिमत्त्वाला साजेशी होती असेही डॉ.पटेल म्हणाले.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला साधेपणा, नम्रपणा हा खूप वेगळा होता. लोहियांच्या कडाव्या समाजवादाच्या विरोधातला हा भाव होता. त्यांच्या अभिनयात तो कधीच डोकावला नाही पण इतर गप्पांवेळी  त्यांच्यातला कडावा समाजवादी समोर यायचा, असे पटेल यांनी सांगितले.

बर्लिन मधल्या एका कार्यक्रमात त्यांचा साधेपणा पाहून जर्मन लोक अवाक झाले असल्याचा हा प्रसंग देखील पटेल यांनी सांगितला. यानंतर राजेश दामले यांनी अभिनेते सचिन खेडेकर यांची प्रकट मुलाखतही घेतली. समीर बेलवलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


Post a Comment

0 Comments