वीजग्राहकांना उत्कृष्ट सेवेसह महसूलवाढीला प्राधान्य द्या : मुख्य अभियंता राजेंद्र पवार

मंडल, विभागांसह विविध कार्यालयांच्या सांघिक कामगिरीचा गौरव


पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये दर्जेदार ग्राहकसेवेसोबतच विविध उपाययोजनांद्वारे महसूलवाढ व वसूलीच्या अधिक कार्यक्षमतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी गुरुवारी (दि. ६) अभियंता व अधिकाऱ्यांना दिले. रास्तापेठ येथे आयोजित वार्षिक आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत पुणे परिमंडलातील उत्कृष्ट ग्राहकसेवा, महसूलवाढ व वसूली कार्यक्षमतेत गेल्या वर्षभरात सातत्याने सांघिकपणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांतील अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व सांघिक प्रमाणपत्र देऊन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते गौरविण्यात आले.


व्यासपीठावर अधीक्षक अभियंता सर्वश्री सतीश राजदीप, प्रकाश राऊत, डॉ. सुरेश वानखेडे, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार म्हणाले, की यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे परिमंडलातील वीजहानी कमी करण्यासोबतच वीजबिलांमधून पुणे परिमंडल थकबाकीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात अचूक बिलिंग, थकीत वीजबिलांची वसूली, महसूलवाढीच्या विविध उपाययोजना, वीजचोरीविरुद्ध कठोर कारवाई आणि तत्पर ग्राहकसेवा या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.   

पुणे परिमंडल अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात विविध निकषांच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या कार्यालयांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे: मंडल कार्यालय– रास्तापेठ मंडल व गणेशखिंड मंडल. विभाग कार्यालय– गणेशखिंड मंडल अंतर्गत पिंपरी विभाग व शिवाजीनगर विभाग,


पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी विभाग व राजगुरुनगर विभाग, रास्तापेठ मंडलअंतर्गत पद्मावती विभाग व नगररोड विभाग. उपविभाग कार्यालय- गणेशखिंड मंडल अंतर्गत चिंचवड उपविभाग व सांगवी उपविभाग, रास्तापेठ मंडल अंतर्गत फायरब्रिगेड उपविभाग व मार्केटयार्ड उपविभाग आणि पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी उपविभाग व उरुळी कांचन उपविभाग. शाखा कार्यालय- गणेशखिंड मंडल अंतर्गत रामबाग कॉलनी शाखा व देहू गाव शाखा,

रास्तापेठ मंडल अंतर्गत गुरुनानक शाखा व सोमवार पेठ शाखा तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत कुंजीरवाडी शाखा व वेल्हा दोन शाखा कार्यालय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले. यावेळी परिमंडलातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments