पुणे : नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्चच्या (सीईजीआर) राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना पदोन्नती मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या 'सीईजीआर'च्या वार्षिक बैठकीत 'सीईजीआर'चे मेंटॉर आणि नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिएशनचे माजी चेअरमन प्रा. के. के. अग्रवाल, मावळते राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संदीप मारवाह यांच्या हस्ते प्रा. डॉ. चोरडिया यांच्याकडे कार्यभार सुपूर्द करण्यात आला व नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
'सीईजीआर' ही संस्था देशातील शिक्षण क्षेत्रासाठी कार्यरत असलेला एकमेव आणि नामांकित असा विचार गट आहे. शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी शिक्षणतज्ज्ञ, माध्यमे आणि धोरणकर्ते यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
सोबतच संशोधन आणि इनोव्हेशनच्या साहाय्याने व्यापक शिक्षणवृद्धीचा प्रयत्न याद्वारे केला जातो. 'सीईजीआर'मध्ये १० हजारांपेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, संशोधक यांचा समावेश आहे. 'सीईजीआर' नॅशनल कौन्सिलवर केरळचे राज्यपाल, नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिएशन (एनबीए), अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतील (एआयसीटीई) नियंत्रक, देशाच्या विविध भागातील ५० कुलपती, कुलगुरू आदींचा सहभाग आहे.
२०२३ या वर्षाकरिता 'सीईजीआर'ची नॅशनल कोअर कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली. 'सीईजीआर'च्या पत्रानुसार त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रेस्टिज युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. दाविश जैन, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, 'एआयसीटीई'चे सल्लागार डॉ. रमेश उन्निकृष्णन, डॉ. आर. के. सोनी,
चित्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधू चित्कार, 'एनडीआयएम'चे चेअरमन व्ही. एम. बन्सल यांची तर उपाध्यक्ष म्हणून आयईएस युनिव्हर्सिटीचे कुलपती बी. एस. यादव, युपीईएस डेहराडूनचे कुलपती प्रा. सुनील राय, एलएनसिटी युनिव्हर्सिटी कुलगुरू डॉ. अनुपम चौकसे,
एकेएस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू अनंत सोनी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल्स कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित सोनी, एएसएम ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांची, तर सदस्य सचिव म्हणून रविश रोशन (संचालक, सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
'सूर्यदत्त'च्या माध्यमातून देशभर वेबिनार्स, सेमिनार्समध्ये भाग घेण्यासह यशस्वी आयोजन केले. 'सूर्यदत्त'मध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध नवोपक्रम राबवले. दुसऱ्या व्यवस्थापन परिषदेला, तिसऱ्या संशोधन व इनोव्हेशन समिटला, इंडस्ट्री-अकॅडमी समन्वयक यावरील सीईजीआरच्या चौथ्या समिटला प्रा. डॉ. चोरडिया यांनी संबोधित केले.
प्रादेशिक भाषांमधून तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांनी अनेक वेबिनार्समध्ये बीजभाषक म्हणून मार्गदर्शन केले. माध्यमे, मनोरंजन आणि समांतर विषयात त्यांनी संधी निर्माण केल्या. रोजगाराभिमुख कौशल्यप्रशिक्षण, प्रभावी तंत्रज्ञानारीत शिक्षण, संशोधन, मान्यता आणि दर्जात्मक शिक्षण यावर अनेक वेबिनार्स घेतले. सर्वांगीण शिक्षणासाठी महत्वपूर्ण सल्ला व मार्गदर्शन देणाऱ्या प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना पदोन्नती मिळाली आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना औद्योगिक क्षेत्राचा २० वर्षांचा तर शिक्षण क्षेत्राचा २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियामक मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्य, इंडस्ट्री युनिव्हर्सिटी पार्टनरशिप चेअर, अमेरिकेतील ग्लोबल चेंबरचे पॅट्रोन म्हणून ते काम पाहत आहेत. यासह मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स अँड आयटीच्या सल्लागार समितीचे सदस्य, उद्योग मंत्रालय अंतर्गत समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
आजवर अनेक एज्युकॉन परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून, विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा केल्या आहेत. विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते एक लोकप्रिय शिक्षक आहेत. डॉ. चोरडिया यांना आजवर १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०० पेक्षा अधिक पेटंट आणि दोन मोठ्या संशोधनासह अनेक जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. चोरडिया म्हणाले, "शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी काम करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळणे आनंददायी आहे. देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, कुलगुरू, उद्योजक, संशोधक यांच्या विचारमंथनातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत उहापोह होतो.
भावी पिढीला अधिकाधिक चांगले शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी 'सीईजीआर'च्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. सूर्यदत्त शिक्षण संस्थेतर्फे गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही गेली दोन दशके करत आहोत. देशभरात शिक्षण क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेत राबविण्यास मदत होते. तसेच आमच्या येथील अनेक चांगले आणि सर्वांगीण विकासाचे उपक्रम राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे."
0 Comments