श्रद्धा सुमन कार्यक्रमात दमदार कलाकारांच्या प्रस्तुतीने पुणेकर रसिकांची मने जिंकली


पुणे : श्रुती बुजरबरुआ, सिद्धार्थ बेलमन्नू, रमाकांत गायकवाड, इंद्राणी मुखर्जी यांचे गायन, जोनाथन व्होयर यांचे संतूरवादन आणि पद्मविभूषण पंडित किशन महाराज यांचे नातू व शिष्य शुभ महाराज यांचे एकल तबलावादन अशा दमदार कलाकारांच्या प्रस्तुतीने पुणेकर रसिकांची मने जिंकली.

निमित्त होते तबला सम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांचे शिष्य व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलच्या वतीने आणि पंचम निषाद संस्थेच्या सहकार्याने आयोजित 'श्रध्दा सुमन' या दोन दिवसीय सांगितीक कार्यक्रमाचे.

आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी त्यांचे शिष्य व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद हे पुण्यात ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.


सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम श्रुखंलेतील हा सलग सहावा कार्यक्रम असून मयूर कॉलनी येथील बालशिक्षण सभागृहात शनिवार व रविवार या दोन सत्रांत संपन्न झाला. पंचम निषाद संस्थेचे संस्थापक शशी व्यास,  संतूरवादक पद्मश्री पंडित सतीश व्यास, गायिका कल्पना झोकरकर, अनुपमा आझाद, ज्योती व्यास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मूळच्या आसामच्या असलेल्या श्रुती बुजरबरुआ यांच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी राग मुलतानीने कार्यक्रमाची सुरुवात केली. यामध्ये त्यांनी 'गोकुल गाम...' हा विलंबित ख्याल, एकतालामध्ये 'नैनन मैं आन बान...' ही बंदिश सादर केली.

वीणा सहस्रबुद्धे यांचा तराणा सादर करीत त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांनी भावना टिकले (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी), ईश्वरी मलघे आणि देविका अंकुलगे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. यांनतर मूळचे कॅनेडाचे असलेले आणि भारतीय शास्त्रीय संगीताची आवड जोपासणारे सुप्रसिद्ध संतूरवादक जोनाथन व्होयार यांचे संतूरवादन झाले.

त्यांनी राग रागेश्रीमध्ये आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, झाला, रुपक ताल आणि द्रुत तीन तालचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांना सौरभ गुळवणी यांनी समर्थ तबलासाथ केली. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा समारोप कर्नाटकचे सिद्धार्थ बेलमन्नू यांच्या गायनाने झाला.

त्यांनी यावेळी राग मालकंस सादर केला. यामध्ये त्यांनी 'कृष्ण माधो राम...' हा विलंबित तालातील ख्याल, 'सून ले ओ मन की बात...' ही आपले गुरू पंडित विनायक तोरवी यांची बंदिश, 'रंग रलीया करत सौतन के संग...' हा द्रुत तीन तालातील ख्याल आणि 'काहे अब तुम आये हो मेरे द्वारे...' ही राग सोहनी मधील बंदिश सादर केली. 'खेलत हैं गिरीधारी मुरारी...' या होरीने त्यांनी आपल्या गायनाचा व कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला. त्यांनी अनिरुद्ध देशपांडे (तबला), डॉ चैतन्य कुंटे (संवादिनी), मयुरेश भोसेकर व ईश्वरी मलघे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रमाकांत गायकवाड यांच्या भारदस्त गायनाने झाली. राग भटियारने त्यांनी गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी 'पिया मिलन की काज सखी अब...' ही पंडित ज्ञानप्रकाश घोष यांची बंदिश सादर केली. यांनतर त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब यांनी संगीतबद्ध केलेले 'हरि ॐ तत्सत...' हे राग पहाडीमधील भजन प्रस्तुत करीत आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संदीपान मुखर्जी (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), योगेश दिवे व कल्याण आपेगावकर (तानपुरा) आणि ओंकार सोनावणे (स्वरसाथ) यांनी साथसंगत केली.

यानंतर किशन महाराज यांचे शिष्य व नातू शुभ महाराज यांचे एकल तबलावादन झाले. हे वर्ष पंडित किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आज जगभरात त्यांचे शिष्य असताना अशा पद्धतीने त्यांना आदरांजली वाहण्याचा महायज्ञ पंडित अरविंद कुमार आझाद यांनीच केला आहे याचे आम्हा परिवाराला आणि शिष्यांना खूप कौतुक आहेच पण आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत, असे सांगत शुभ महाराज यांनी अरविंद कुमार आझाद यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रम शृंखलेचे कौतुक केले.

ते पुढे म्हणाले, "कोणतीही घराण्याची पद्धती आणि स्टाईल विकसित होत असताना त्याला काहीना काही पार्श्वभूमी असते. मात्र पंडित किशन महाराजांनी जो विचार केला आणि ज्या रचना केल्या त्या कोणत्याही पार्श्वभूमीवर केल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांचे कार्य हे इतरांहून निराळे आहे, असे मला वाटते."

शुभ महाराज यांनी बनारस घराण्याच्या पारंपरिक आलाप, जोड, झाला यांचे सादरीकरण केले. यानंतर त्यांनी चलन, रेला, तीनताल मध्ये बनारस घराण्याच्या परंपारिक बंदिशी यांचे प्रस्तुतीकरण केले. गत, कायदा यांच्या दमदार प्रस्तुतीने आणि द्रुत तीनतालाचे वादन करीत त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. यावेळी त्यांना अमेय बिच्चु यांनी लेहरासाथ केली. यांनतर इंद्राणी मुखर्जी यांनी आपले गायन प्रस्तुत केले. त्यांनी राग बिलासखानी तोडी प्रस्तुत केला.

यामध्ये त्यांनी आपले गुरू पंडित रामाश्रेय झा यांच्या विलंबित तालातील 'ये री तू धन धन तेरो भाग...' आणि ‘जगदंबे मातीका...’ ही द्रुत तीन तालातील बंदिश गायली. यानंतर त्यांनी राग काफीमध्ये एक होरी प्रस्तुत केली. राग भैरवीमधील भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा आणि कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना अरविंद कुमार आझाद (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), आणि ईश्वरी मलघे आणि देविका अंकुलगे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पंडित अरविंद कुमार आझाद यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments