मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे गौरवोद्गार
पुणे : ‘अतिशय जोखमीच्या व धकाधकीच्या वीज क्षेत्रात २४ तास सुरळीत वीजपुवरठ्यासाठी ग्राहकांना अविश्रांत सेवा देणारे जनमित्र हे महावितरणचे आधारस्तंभ आहेत. ग्राहकांशी थेट संपर्क व संवाद साधून त्यांना तत्पर सेवा देणारे जनमित्र खरे ‘प्रकाशदूत’ आहेत’ अशा शब्दांत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी जनमित्रांचा शनिवारी (दि. ४) गौरव केला.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून महावितरणसह देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित पुणे परिमंडलाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, देशभरात ‘लाईनमन दिन’ साजरा होत असल्याचा एक सहकारी म्हणून विशेष आनंद झाला आहे. लाईनमन म्हणजेच जनमित्र हा वीज वितरण यंत्रणा तसेच ग्राहकसेवेचा अविभाज्य घटक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होईपर्यंत जनमित्रांना कोणत्या दिव्यातून जावे लागते याची फारशी माहिती कोणाला नसते.
परंतु ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ ही मोठी चक्रीवादळे तसेच कोरोना संसर्गाचा कालावधीमध्ये शहरी भागांसह दऱ्याखोऱ्यातील अतिदुर्गम भागातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंत्यांसह जनमित्रांनी केलेली कामगिरी हा उत्कृष्ट ग्राहकसेवेचा मानदंड आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले. अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक सेवा क्षेत्रात काम करताना थोडा ताणतणाव येणे स्वाभाविक आहे. परंतु वीजयंत्रणेमध्ये काम करताना जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करून शांतचित्ताने व एकाग्रतेने काम करावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये असे आवाहन मुख्य अभियंता श्री. पवार यांनी केले.
यावेळी अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनी सांगितले की, विविध सेवा देण्यासाठी थेट ग्राहकांशी संपर्क साधणारे जनमित्र हे महावितरण व ग्राहक यांच्यामध्ये महत्वाचा दुवा आहे. जनमित्रांनी दिलेल्या ग्राहकसेवेवरच महावितरणची प्रतिमा अवलंबून आहे. ते करीत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावरच महावितरणची मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे महावितरणसह एकूणच वीज क्षेत्रात जनमित्रांचे योगदान मोलाचे आहे असे गौरवोद्गार श्री. राऊत यांनी काढले. कार्यक्रमात अनेक जनमित्रांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात महिला व पुरुष जनमित्रांचा गौरव करण्यात आला. यावेळी वीजसुरक्षेची शपथ घेण्यात आली तसेच सुरक्षेसंदर्भात प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले.
अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत, मधुकर घुमे, बाळासाहेब हळनोर, मनीष सूर्यवंशी, भागवत थेटे, संजय वाघमारे, माणिक राठोड आदींसह अभियंते, अधिकारी व जनमित्रांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
0 Comments