अमेरिकेत गोदी मीडियावर उगारला गेला बडगा, भारतात कधी?

सरकारच्या आरत्या ओवाळणाऱ्या मीडियाचा भारतात बोलबाला


- सुधीर देशमुख

- संपादक, WebNews24


पुणे : तथ्यशोधन आणि सत्यशोधनाचा आपला वसा टाकून दिल्यानंतर केवळ सरकारी गुलामीचा पट्टा आपल्या गळ्यात घालून घेणाऱ्या व नेहमीच सरकारचे रक्षक बनून केवळ विरोधकांवर भुंकत राहणाऱ्या गोदी मीडियाचा सध्या भारतात प्रचंड बोलबाला आहे, हे सांगण्यासाठी आता कोण्या तज्ञाची गरज उरली नाही. अर्थात, हा आजार काही आता भारतातच राहिलेला नाही. तो अमेरिकेसारख्या बलाढ्य व प्रगत देशातदेखील आहे. परंतु तेथे नुकतीच या अमेरिकन गोदी मीडियावर न्यायालयाकडून एक मोठी `सर्जरी` करण्यात आली आहे. धादांत खोट्या बातम्या पेरणाऱ्या फाॅक्स न्यूज चॅनेलवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे व या चॅनेलवर लक्षावधी डाॅलर्सचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. भारतात मात्र आजही या सरकारी गुलाम गोदी मीडियावर कोणत्याही कारवाईचा मागमूस दिसून येत नाही. त्यामुळे अमेरिकेतील हे बदलाचे वारे भारतातही वाहणे अत्यंत गरजेचे बनले आहे.


भांडवलशाहीच्या वेष्टनामध्ये पूर्णपणे गुंडाळल्या गेलेल्या भारतीय मीडियाने गेल्या सात-आठ वर्षांमध्ये किंबहुना त्याहून अधिक काळापासून जो काही धुमाकुळ घातला आहे, त्याला खरेतर इतिहासातही तोड नाही. कुठल्याही पातळीवर जाऊन प्रछन्नपणे सरकारची बाजू लावून धरणे, विरोधकांनी सरकारला खिंडीत गाठल्यानंतर स्वतःमध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे संचारल्यासारखे खिंड लढवणे, सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी विरोधक कसे बदमाश आहेत, हे आभासी आणि अस्तित्वहीन पुराव्यांद्वारे पटवून देणे,


काँग्रेस, कम्यूनिस्ट किंवा समाजवाद्यांनी इतिहासात काय पापे केली (केली नसतील तरी) हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणे, प्रसंगी केंद्रीय सत्ताधारी पक्षाची एखाद्या निवडणुकीत धुळधाण उडाली तर ही धुळधाण उडवणारी जनता कशी मुर्ख आहे, हेही बेशरमपणे पटवून देण्याचे काम या गोदी मीडिया व त्यांच्या लाळघोटू अँकर मंडळींनी देशात चालवले आहे. आज अक्षरशः पेड न्यूज आणि फेक न्यूजचा धुराळादेखील या गोदी मीडियाने उडवून दिला आहे.


या धुराळ्यात जनतेचे लक्ष हे वास्तविक मुद्द्यांपासून भरकटवणे, सरकारचा वाट्टेल त्या थराला जाऊन बचाव करणे, विरोधकच कसे नालायक होते, हे दाखवण्याचा आहे. परंतु कधी-कधी सरकारी लाळचाटूपणा करताना या चॅनेल्सनी अगदी कमरेचे सोडून डोक्यालादेखील बांधलेले आपण पाहतो.


आता हे सगळे प्रकार भारतात खपून जातात. परंतु ते सगळीकडे खपतीलच असे नाही. भारतात जसा गोदी मीडिया आहे, तसाच अमेरिकेत `ट्रम्पी मीडिया` (ट्रम्प यांची अनावश्यक भलामण करणारा) आहे. त्याचे नाव आहे फाॅक्स न्यूज. हे चॅनेल मीडिया क्षेत्रातील टायकून रुपर्ट मरडाॅक यांचे आहे. या फाॅक्स न्यूजने अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीत पूर्णपणे डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू लावून धरली. परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यांना जनतेने धडा शिकवला. ज्यो बायडन विजयी झाले. परंतु या विजयानंतर फाॅक्स न्यूज ने अत्यंत फेक, खोटारड्या आणि भ्रम फैलावणाऱ्या बातम्या चालवल्या.


फाॅक्स न्यूज ने पुरावे नसतानाही निवडणूक प्रक्रियेत प्रचंड गैरप्रकार झाल्याचा कांगावा केला. अर्थात, त्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते. केवळ ट्रम्प यांची बाजू उचलून धरण्यासाठी फाॅक्स न्यूजने धादांत खोट्या बातम्या चालवल्या. 


त्या विरोधात तेथील निवडणूक यंत्रणेने फाॅक्स न्यूजवर खटला भरला. या संपूर्ण प्रकाराची गहन चौकशी करण्यात आली. चौकशीत हे स्पष्ट दिसून आले की, फाॅक्स न्यूज ने खोट्या बातम्या चालवल्या व लोकांमध्ये भ्रम निर्माण केला. फाॅक्स न्यूजच्या अनेक पत्रकारांचे फोन काॅल्स ट्रेस करण्यात आले. स्पष्ट झाले की, फाॅक्स न्यूज ने केवळ ट्रम्पची चाटुगिरी करण्यासाठी हा प्रकार केला. 


त्यानंतर तेथील न्यायालयाने फाॅक्स न्यूजचा मालक रुपर्ट मरडाॅक याला न्यायालयात बोलावले. तेथे मरडाॅक याने चक्क कोलांटउडीच मारली. त्याने सरळ काखा वर करीत न्यायालयात सांगितले की, यात माझा काहीही हात नाही. माझ्या चॅनेलच्या काही रिपोर्टर व संपादकांनी परस्पर हे दुष्कृत्य केले असावे. मी कोणालाही याबाबत जबरदस्ती केली नाही. यावरून हे दिसून येते की, चॅनेल्सचे मालक किती दुटप्पी असतात. एव्हढ्या प्रछन्न खोट्या बातम्या फाॅक्स न्यूजवरून प्रकाशित होत होत्या, तर हा मरडाॅक काय झोपी गेला होता का? 


कोणताही संपादक किंवा रिपोर्टर मालकाच्या मर्जीशिवाय अशाप्रकारच्या फेक बातम्या प्रसारित करूच शकत नाही. परंतु आपल्या अंगावर शेकायला आली की, मालक मंडळी कशी कुणाला तरी बळीचा बकरा बनवतात, हे या प्रकरणावरून दिसून येते. परंतु मरडाॅकने हा जो काही `शार्विलकाचा प्रतिशंखनाद` केला आहे, त्याने मात्र त्या चॅनेलचे रिपोर्टर व काही संपादकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. यापासून गोदी मीडियातील रिपोर्टरनी चांगला धडा घेणे गरजेचे आहे. 


अमेरिकी मीडियात हे जे काही  महाभारत घडले, तेच सध्या देशात होते आहे. केवळ हिंदू-मुस्लिम डिबेट करून, बेमतलबच्या बातम्या चालवून तसेच देशातील वातावरण बिघडवण्याचे पातक सध्या हा गोदी मीडिया करीत आहे. देशात बोकाळलेली बेरोजगारी, गगनाला भीडणारी महागाई, महिला अत्याचार, भांडवलदारांकडून होत असलेली देशाची लूट, कामगार-कष्टकऱ्यांच्या अधिकारांवरून फिरणारा बुलडोजर, या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी गोदी मीडियाची कवायत सुरू आहे.


मोदी सरकारच्या छुटपूट यशालाही हा मीडिया अशाप्रकारे वाढवून-चढवून दाखवतो आहे की, जणुकाही आता देश सुजलाम् सुफलाम् होणार आहे. देशात एकीकडे जातीय-धार्मिक विद्वेषाचे विष पेरले जात असतानाही देशात `अमृत काळा`ची मीडियाकडून हाकाटी पिटली जात आहे. परंतु या सर्व विषयांवर येथे मात्र कारवाई होताना दिसत नाही. जे अमेरिकेत घडले ते भारतात का घडू शकत नाही. देशात अराजक माजवून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोदी मीडियावर देशातही चाप लागणे गरजेचे आहे. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने हे होईल, तो दिवस खऱ्या अर्थाने `अमृत काळा`चा सुदिन म्हणावा लागेल.


Post a Comment

0 Comments