पुणे : मुद्रांक शुल्क आणि रेडी रेकनर दरामध्ये कोणतेही बदल न करण्याच्या निर्णय आज राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बांधकाम क्षेत्रासाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोचे रणजित नाईकनवरे म्हणाले, “रेडी रेकनर दरांचे तर्कसंगत पुर्नमूल्यांकन व्हावे आणि मुद्रांक शुल्काचे दर वाढवू नयेत यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोच्या शिष्टमंडळाने राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुद्रांक शुल्क नोंदणी विभागातील उच्च अधिकारी यांची सातत्याने भेट घेऊन, याबाबत शिफारश आणि विनंती केली होती. आमच्या या विनंतीची सकारात्मक दखल घेत, राज्यसरकारने आज जो निर्णय जाहीर केला आहे, त्याबाबत आम्ही त्यांचे आभारी आहोत.’’
रेपो दरात होणाऱ्या वाढीमुळे घरखरेदीदार हे आधीच प्रभावित झाले आहे. त्यामुळे आज घेण्यात आलेल्या या निर्णयाने त्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. याचा फायदा घरखरेदीदारांना होईल असे सांगत नाईकनवरे म्हणाले, “गृहकर्जाचे व्याजदर हे नेहमीच बदलत राहतात, त्यामुळे रेपो दरातील वाढ ही अधिक प्रभावी असली, तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची असते.
मात्र मुद्रांक शुल्क आणि रेडीरेकनर दर ग्राहकांची खरेदी क्षमता आणि बांधकाम खर्च यांवर थेट प्रभाव करत असल्याने, त्यांचा परिणाम हा कायमस्वरूपी असतो. आज जाहीर झालेल्या या निर्णयाचा बांधकाम उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल, तसेच या उद्योगाच्या विकासाबरोबरच रोजगारनिर्मिती व अर्थव्यवस्थेच्या विकासाला देखील चालना मिळेल.”
क्रेडाई पुणे मेट्रो ही संस्था भविष्यातदेखील आपल्या सर्व भागधारकांच्या सहकार्याने उद्योजक आणि घरखरेदीदार यांचा आवाज बनत, त्यांचे मत मांडण्यासाठी कार्यरत राहील, असा विश्वासही नाईकनवरे यांनी व्यक्त केला.
0 Comments