पुणे : क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे यांची बिनाविरोध निवड करण्यात आली आहे. शनिवार दि. १ एप्रिल रोजी मावळते अध्यक्ष अनिल फरांदे यांच्याकडू रणजीत नाईकनवरे हे क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
नुकत्याच झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत नाईकनवरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोच्या उपाध्यक्षपदी अमर मांजरेकर, मनीष जैन, आदित्य जावडेकर, राजेश चौधरी, विनोद चांदवानी, अरविंद जैन यांची तर अश्विन त्रिमल आणि तेजराज पाटील यांची यांची अनुक्रमे सचिवपदी व सह-सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
आय पी इनामदार हे संघटनेचे नवीन कोषाध्यक्ष असतील. कपिल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा जनसंपर्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबरोबरच संघटनेच्यावतीने अखिल अगरवाल हे रेरा संदर्भातील विषय तर मनीष कनेरिया हे पर्यावरणाशी निगडीत विषय हाताळतील.
व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यपदी बांधकाम व्यावसायिक जे. पी. श्रॉफ, संजय देशपांडे, अखिल अगरवाल, मनीष कनेरिया, संतोष कर्णावत, सतीश अगरवाल, सपना राठी, केतन रुईकर, दिलीप मित्तल, अनुप झमतानी, सिद्धार्थ मूर्ती, पुनीत ओसवाल, अभिषेक भटेवरा, वसंत काटे, ईशान मगर, कपिल त्रिमल यांची निवड करण्यात आली आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असून नाईकनवरे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीचे ते संचालक आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी विषयामध्ये पदवी मिळविली आहे. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण व फायनान्स विषयात एमबीए अर्थात मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे. अनेक सामाजिक व सेवाभावी कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे.
0 Comments