संगीत, नृत्य व इतर ललित कला क्षेत्रातील कार्यासाठी करार
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी) आणि संगीत नाटक अकादमी यांच्यामध्ये संगीत, नृत्य व इतर ललित कला क्षेत्रातील कार्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.
सीसीआरटी बरोबर अनेक विषयांवरील कार्यशाळा, प्राध्यापकांसाठी कार्यशाळा, विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे कार्यक्रम, प्रयोगकलांमधील संशोधन प्रकाशन, संगीत आणि नृत्य विषयांमधील दृक – श्राव्य साधनांची निर्मिती आणि संशोधन या विषयांवर सीसीआरटी आणि स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने काम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम पुणे आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी होतील.
सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद इंदुरकर, संचालक ऋषी वशिष्ठ, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, संचालक रिटा स्वामी, सचिव राजू दास स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे, नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठाकूर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. त्यांच्यातील चर्चेनुसार संगीत नाटक अकादमी आणि स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये नवीन कलाकारांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
शारंगधर साठे म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् हे आज संगीत, नृत्य विषयातील शिक्षण गुरुकुल पद्धतीने देणारे एक अग्रगण्य महाविद्यालय ठरले आहे. सामंजस्य करारामुळे स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् च्या निवडक विद्यार्थ्यांना भारतामध्ये संगीत नाटक अकादमी तर्फे आयोजित होणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांच्या महोत्सवामध्ये सादरीकरणाची संधी मिळणार आहे. उत्तर पूर्व राज्यांमध्ये देखील शास्त्रीय संगीत आणि नृत्य विषयांच्या प्रचार प्रसारात स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् ला महत्वाची भूमिका देण्यात आली आहे.
0 Comments