जीर्णोद्धार करताना मंदिरांचे प्राचीनत्व जपले पाहिजे : ओंकार वर्तले

स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला पुष्प तिसरे 


पिंपरी : मावळात प्राचीन काळातील सुंदर कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेली अनेक मंदिरे आहेत. मात्र, मंदिरांचा जीर्णोद्धार करताना मूर्त्यांचे मूळ स्वरूप सोन्याचांदीचे मुखलेप लावून विकृत न करता ते मूळ स्वरूपात पुढील पिढ्यांना पाहता यावा, यासाठी प्रयत्न केला जावा. तसेच मंदिरांचे प्राचीनत्व जपले जावे. हा ठेवा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे आवाहन व्याख्याते ओंकार वर्तले यांनी केले.


तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे आयोजित 'स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले'त तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, विन्सेंट सालेर, मिलिंद शेलार, सुदाम दाभाडे, कैलास काळे, बाळासाहेब शिंदे, राहुल खळदे, ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे, शंकर हदिमणी, हिरामण बोत्रै, सुमती निलवे, संदिप पानसरे, रवि  दंडगव्हाळ, पांडुरंग पोटे, अनिल धर्माधिकारी, सुनिल खोल्लम, योगेश शिंदे उपस्थित होते.


ओंकार वर्तले यांनी सांगितले, की मावळ भागाला मंदिरांचा खूप मोठा इतिहास आहे. विशेषतः मिश्र कालीन मंदिरे पाहायला मिळतात. यामध्ये शिव मंदिरांची संख्या मोठी आहे. त्यांची कलाकुसर वाखाणण्याजोगी आहे. मात्र, या मंदिरांच्या संवर्धनासाठी कोणतीच व्यवस्था दिसत नाही. गावकऱ्यांनाच देखभाल करावी लागते. शासनाने लक्ष पुरवून निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.


आज अनेक ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याच्या नावाखाली मंदिरांचे प्राचीन वैभव पुसून टाकण्याचे काम केले जात आहे. याला पायबंद बसला नाही, तर भावी पिढीला आपल्या प्राचीन संस्कृतीविषयी माहिती मिळणार नाही. विशेष म्हणजे पाच पांडव मंदिर हे मध्यप्रदेश आणि त्यानंतर मावळात आढळते. या मंदिराचा लोकांनी प्रसार केला पाहिजे, हे मंदिर इथेच का ? याचे उत्तर कुठेही सापडत नाही. त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. सांस्कृतिक वैभव मंदिरांमध्ये शोधले पाहिजे. काही मंदिरांचे लाकडी काम आजही आकर्षक दिसते. पुरातत्त्व विभागाने ही मंदिरे जपण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.


जुन्या मंदिरांनी समाज हा केंद्रस्थानी मांडला होता. म्हणजे मंदिरे ही विशिष्ट समुदायासाठी नव्हती. या मंदिरांमध्ये विविध कलाविष्कार चालायचे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून मंदिरांचे जिर्णोद्धार केले जात आहेत, ही चिंतेची बाब आहे, असेही वर्तले यांनी सांगितले.


व्याख्यानमालेच्या प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे यांनी व्याख्यानमालेच्या विषय निवडीमागची पार्श्वभूमी सांगितली. प्रमुख पाहुणे दीपक फल्ले यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले. सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर अनिल धर्माधिकारी यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments