माजी बॅडमिंटनपटू पद्मश्री प्रकाश पदुकोण
८४ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या योनेक्स सनराईज ८४ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे शुक्रवारी प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी एस. मुरलीधरन, ओमर राशीद, जसविंदर नारंग, मंगेश काशीकर, वैभव डांगे, पुणे जिल्हा आणि शहर बॅडमिंटन संघटनेचे रणजित नातू, अण्णा नातू, श्रीकांत वाड आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस बँडने पदुकोण यांना मानवंदना दिली व नंतर पोलीस बँडच्या तालावर सर्व खेळाडूंचे संचलन झाले.
थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या ७४ वर्षांच्या काळात महाराष्ट्रातले जे पुरुष खेळाडू थॉमस कपसाठी खेळले त्या खेळाडूंचा सन्मान प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते झाला. खेळाडूंना ताम्रपत्र, पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले. आसिफ पापरिया, इक्बाल मैदर्गी. लेरॉय, संजय शर्मा, रवी कुंटे, विजय लेन्सी,अक्षय देवलकर, जिष्णू सन्याल, निखिल कानेटकर, उदय पवार, आनंद पवार, चिराग शेट्टी, या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. दत्ता धोंगडे, दिपांकर भट्टाचार्य यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
प्रकाश पदुकोण म्हणाले, आज बॅडमिंटनमध्ये खेळणारी पिढी खरंच खूप नशीबवान आहे. त्यांना सर्व एका हाकेसरशी मिळत आहे. बॅडमिंटनही हा भारतात दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ बनला आहे. आमच्या काळात स्पर्धांना जाण्यापासून, स्पर्धा केंद्रावर राहणे, साहित्याची उपलब्धता या सगळ्याबाबत अडचणीच अडचणी होत्या. मात्र, आता चित्र बदललेले आहे.
ते पुढे म्हणाले, आमच्या कालावधीत आम्हाला संधीची वाट पहावी लागत होती. आज बॅडमिंटन इतके वाढले आहे की स्पर्धा संख्याही वाढल्या आहेत. विविध स्पर्धांच्या माध्यमातून वेगवेगळी व्यासपीठ खेळाडूंसाठी निर्माण झाली आहेत. त्यामुळे आता संधी वाट पहाते की काय असे वाटते. सरकार, संघटना, पुरस्कर्ते, प्रशासक अशा सगळ्याच आघाड्यांवर सहकार्य मिळत आहे. त्यामुळे यांचा हात हातात घेऊन कसे पुढे जायचे हे खेळाडूंनी ठरवायचे आहे.
पदुकोण यांनी बॅडमिंटनच्या वाढीस अनेक वाटा मिळाल्या आहेत. अनेक जण यात काम करत आहेत. पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेने अशा मोठ्या आयोजनाची संधी मिळाली की ती नेहमीच यशस्वी करून दाखवली आहे. बॅडमिंटनच्या प्रसारास अजूनही वाव आहे. त्यावर काम करता येईल, असेही मत पदुकोण यांनी मांडले.
दुखापती आणि कामगिरी हे खेळाडूच्या कारकिर्दीमधील एक अविभाज्य घटक आहेत. आपली तंदुरुस्ती कशी उत्तम राहील आणि चांगली कामगिरी कशी करता येईल याकडे खेळाडूंचे लक्ष वाढायला हवे. असेही पदुकोण म्हणाले. बॅडमिंटनपटूंना आज कारकिर्द घडवताना संधी आणि सुविधा दोन्ही सहज उपलब्ध होत आहेत. आता त्याचा फायदा करून घेणे तुमच्या हातात आहे, असे आवाहन भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी नव्या पिढीला केले.
स्पर्धा आयोजकांचे विशेष कौतुक
प्रकाश पदुकोण यांनी स्पर्धा आयोजकांचे कौतुक केले. राष्ट्रीय स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. टूर्नामेंट अॅपचे देखील विशेष कौतुक केले.
0 Comments