पुण्यात सावत्र आईच्या मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू, गुन्हा दाखल

उत्तमनगर मधील धक्कादायक घटना


पुणे ः  आईसारखे पवित्र दैवत खरंतर जगात कुठेही नाही.  परंतु काही दूर्मिळ व अपवादात्मक घटनांमध्ये हीच आई अत्यंत क्रूर बनते. त्या वेळेस खरंच म्हणावेसे वाटते की `माता न तू वैरिणी`. अशाच एका वैरिणी मातेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना उत्तमनगरमधील असून या `वैरिणी` मातेने आपल्या पाच वर्षीय सावत्र मुलीचा खून केला आहे.


शहरातील शिवणे उत्तमनगर धावडे बिल्डिंग परिसरात राहणाऱ्या रितिका राजेश आनंद (वय ३६) या महिलेने तिची सावित्र मुलगी श्वेता राजेश आनंद (वय ५ वर्षे) हिला केलेल्या जबर मारहाणीत श्वेताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परिसरात या क्रूर मातेविरोधात रोष व्यक्त होत आहे. यासंदर्भात पोलिस काॅन्स्टेबल आनंद घोलप यांनी स्वतः फिर्याद दाखल केली असून, या फिर्यादीवरून पोलिसांनी रितिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


अशी उघड झाली घटना

उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजता श्वेताला फिट आल्याचे सांगत तिची सावत्र आई रितिकाने तिला ससून हाॅस्पिटला दाखल केले. दरम्यान, तिची तपासणी केल्यानंतर डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर श्वेताचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यात तिच्या अंगावर चटके दिल्याचे व्रण दिसून आले, तसेच तिला अमानूष मारहाण केल्याचे व डोक्यात अवजड वस्तू मारल्याचेही डाॅक्टरांना आढळले. या मारहाणीतच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. 


डाॅक्टरांच्या अहवालावरून पोलिसांनी चौकशी केली व क्रूर माता रितिका आनंद हिच्याविरोधात कलम ३०२, १८२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments