'शरीरावरील पुरळ' विषयावरील जनजागृती अभियानात गौतम बंबावाले यांचे प्रतिपादन
पुणे : " कोविड -१९ ही एक जागतिक आरोग्य समस्या होती. त्यासाठी सर्व देशांनी मिळून एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता, देशांनी वैयक्तिक स्तरावर त्याचा सामना करण्यास अधिक प्राधान्य दिले. जागतिक आरोग्यविषयक समस्या सोडविताना त्याबाबत वैयक्तिक दृष्टिकोन न ठेवता सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, " असे मत चीन आणि पाकिस्तानमधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबावाले यांनी व्यक्त केले.
द ऑटोइम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशन (एआयबीडीएफ) या 'शरीरावरील पुरळ' या विषयावर जनजागृती आणि या विकारासंदर्भात मदतीसाठी काम करणाऱ्या संघटनेचे आज लोकार्पण करण्यात आले. जागतिक ख्यातीचे त्वचारोग तज्ज्ञ आणि अमेरिकेतील बोस्टन येथील सेंटर फॉर ब्लीस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. अब्दुल रझाक अहमद यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बंबावाले बोलत होते. विधी महाविद्यालय रस्ता येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव–कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून गौतम बंबावाले त्याचप्रमाणे द ऑटोइम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनचे विश्वस्त व ज्येष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरद मुतालिक, अशोक सुरतवाला, वरिष्ठ विधीज्ञ जयंत हेमाडे आणि आर्थिक नियोजनकार अनिरुद्ध बंबावाले हे यावेळी उपस्थित होते.
शरीरावरील पुरळ ही कोणत्याही एका देशापुरती मर्यादित असलेली आरोग्य समस्या नाही,तर अनेक देशातील नागरिक या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळेच या विकारावरील उपचाराबाबत परस्पर सहकार्य आवश्यक आहे, असेही बंबावाले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. रझाक यांनी त्वचारोग, त्यातील उपचार आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, " शरीरावर येणारे पुरळ, फोड हे संसर्गजन्य विकार नाहीत. गेल्या १० ते १५ वर्षांत यावर अनेक चांगले औषधोपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नागरिकही या विकारावर उपचार करून घेण्यास अतिशय सकारात्मक असतात.
मात्र भारतात यावरील उपचार हे तुलनेने महाग आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औषधांचे दर. औषधनिर्मिती कंपन्यांनी हे दर कमी करण्यास मदत केली, तर निश्चितच या विकरावरील उपचार आणखी स्वतः होऊ शकतील. त्याचबरोबर या क्षेत्रात आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुण डॉक्टरांना 'स्कॉलरशिप'च्या माध्यमातून उपचार, संशोधन आणि जागरूकता यासाठी काम करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे."
यावेळी बोलताना मृणाल देव - कुलकर्णी म्हणाल्या, "आरोग्य हा बहुतांश वेळा दुर्लक्षित केला जाणारा विषय असतो. अनेक आजारांबाबत आपल्याला माहिती नसते. आपले शरीर काय सूचना देत आहे, हे आपल्याला समजत नाही. कारण त्याबाबत आपण फारसे जागरूक नसतो. इतकेच नव्हे, तर एखादा त्रास होत असेल, तर आपण गुगलवर त्याचा इलाज शोधून तो करत असतो, ज्याला बहुतांश वेळा कोणताही शास्त्रीय आधार नसतो. यामुळे वैद्यकीय उपचार घेण्यात दिरंगाई होते, परिणामी तो आजार आणखी वाढतो. त्यामुळेच आरोग्यविषयक जागरूकता फार महत्त्वाची आहे. आज एआयबीडीएफ या अशाच एका जागरूकतापर संघटनेचा लोकार्पण होत आहे, याचा मनापासून आनंद वाटत आहे."
कार्यक्रमात डॉ. मुतालिक यांनी प्रास्ताविक केले. डॉ. यशश्री रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सुरतवाला यांनी आभार मानले. एआयबीडीएफबाबत : अशोक सुरतवाला यांच्या पत्नी जयश्री सुरतवाला यांच्या स्मृतीप्रित्यर्थ द ऑटोइम्युन ब्लीस्टरिंग डिसीज फाउंडेशन या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
ही संघटना 'शरीरावरील पुरळ' या विषयावर जनजागृती आणि या विकारासंदर्भात मदतीसाठी काम करते. लवकरात लवकर निदान आणि योग्य उपचाराच्या अनुषंगाने या विकाराबाबत लोकांना मार्गदर्शन करणे, त्यांना उपचारासाठी प्रोत्साहित करणे आणि आवश्यक ते आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
0 Comments