पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य पं. श्रीनिवास जोशी आणि गानसम्राज्ञी किशोरी अमोणकर यांच्या शिष्या मंजिरी असणारे - केळकर यांचे गायन आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या सुमधुर बासरी वादनात रसिक दंग झाले. स्वर - सुरांनी रंगलेली एक अनोखी संध्याकाळ रसिकांनी शनिवारी अनुभवली.
कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित तीन दिवसीय कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या गायन - वादनाच्या दमदार प्रस्तुतीने कला रसिकांची मने जिंकली. महोत्सवाची सुरूवात माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरवी राव यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, प्रसिद्ध सनईवादक कल्याण आपार, मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तबलावादन सादर झाले, तर कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राग तिलक कमोद'मध्ये ' कोयलिया बोले अंबुवा के ...' ही बंदिश आणि 'गगन सदन...' हे गीत सादर केले.
त्यानंतर पं. श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांनी राग पुरीया कल्याण'द्वारे आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये ' आज सोबन ...' ही विलंबित एक तालातील बंदिश, द्रुत तीन तालात 'बहुत दिन बित...' बंदिश सादर केली. त्यानंतर त्यांनी ' आता कोठे धावे मन...' हा अभंग सादर केला. 'कसा मला टाकून गेला राम ....' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना
अविनाश दिघे ( हार्मोनियम ), किशोर कोरडे ( तबला), मंदार भारती व स्वप्नील राठोड ( तानपुरा), गंभीर महाराज ( पखवाज) आणि विद्याधर विरोकर ( टाळ ) यांनी साथ केली.
उत्तरार्धातील पहिल्या सत्रात पं. रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग रागेश्रीने आपल्या वादनाची सुरूवात केली. त्यानंतर आलाप, जोड, झपताल आणि तीन तालात त्यांनी दमदार प्रस्तुती केली. खमाज रागात त्यांनी सादर केलेल्या ' वैष्णव जन तो ...' या भजन सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या भरभरून प्रतिसाद दिला.
त्यांना पं. रामदास पळसुले ( तबला) यांनी साथ केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता मंजिरी असणारे - केळकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग नंद'ने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये 'ढूँडू बारे सैया...' ही विंलंबित तीनतालामधील बंदिश, छोटा ख्याल'मध्ये द्रुत तीन तालातील बंदिश 'अजहू न आये शाम...' , बसंतबहार रागात 'जोगी वही...' ही मध्यलय तीन तालातील बंदिश सादर केली. ' गुरुजी मैं तो...' या निर्गुणी भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संजय देशपांडे (तबला) आणि डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम ) यांनी साथ केली.
0 Comments