राजकारणाद्वारे देशामध्ये महत्वपूर्ण बदल शक्य : खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजित  ६ व्या युवा संसदेचा समारोप 


पुणे : राजकारणासोबतच कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी महत्वाची असते. समाजात चांगले बदल घडविण्यासाठी राजकारण महत्त्वाचा घटक आहे. राजकारणाद्वारे  आपण देशामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो.


परंतु आजचे तरुण हे केवळ राजकारणाच्या बाहेर राहून  टीका करण्यात करण्यात समाधान मानतात. राजकारणामध्ये चांगले बदल घडवायचे असतील तर राजकारणामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले पाहिजे, असे मत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

 

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे संस्थेच्या नऱ्हे येथील कॅम्पसमध्ये आयोजित ६ व्या युवा संसदेच्या समारोपप्रसंगी रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार, इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर  जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. 


सरपंच सुनील जाधवर यांना आदर्श सरपंच पुरस्कार, नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, आमदार भरत गोगावले आणि आमदार आदिती तटकरे यांना यावेळी आदर्श आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही यावेळी आदर्श खासदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. 


रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,  व्यक्तीने ग्रामसभा ते लोकसभा अशा कोणत्याही एका क्षेत्रामध्ये आयुष्यात एकदा तरी सहभागी झाले पाहिजे. त्यामुळे समाजामध्ये तळागाळात काय परिस्थिती आहे याची आपल्याला जवळून जाणीव होते.

 

उल्हास पवार म्हणाले, आज राजकारणाबरोबरच समाजाच्या अनेक क्षेत्रांमध्ये लोक दर्शनापेक्षा प्रदर्शनाला अधिक महत्त्व देत आहे. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचे केवळ जय-जयकार न करता त्यांचे  गुण अंगी बाळगले पाहिजेत.


आदिती तटकरे म्हणाल्या, उच्चशिक्षित तरुण राजकारणामध्ये येणे ही केवळ समाजाचीच नव्हे तर राजकारणाची ही गरज आहे. चांगले तरुण जर राजकारणामध्ये आले तर निश्चितच राजकारणाला चांगली दिशा मिळू शकेल आणि त्यामधून आपण देश घडविण्यासाठी कारणीभूत असणारे निर्णय घेऊ शकतो.


भरत गोगावले म्हणाले, आमदार किंवा खासदार होणे सोपे नाही, त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. राजकारणावर केवळ टीका करून समाधान न मानता चांगले बदल घडवायचे असतील तर प्रत्यक्ष राजकारणामध्ये तरुणांनी सहभागी व्हावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments