पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सुमारे दीड तास चाललेल्या या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी अनेक नवीन योजनांची, विविध क्षेत्रातील निधीच्या आरक्षणाची तसेच गुंतवणूक, कर, आयात-निर्यात यासंदर्भात विविध प्रकारच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पानंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील काही नामवंत व्यावसायिक-उद्योजकांनीही प्रतिक्रिया दिल्या. बघुयात त्यातील काही निवडक प्रतिक्रिया....
सतीश मगर, चेअरमन , क्रेडाई नॅशनल - पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या निधीमुळे देशाचा एकूण विकास होण्यास निश्चितच मदत होईल. याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होईल. त्याचबरोबर उत्पन्नावरील करामध्ये देण्यात आलेल्या सूटमुळे मध्यमवर्गीय नागरिकांच्या आर्थिक क्षमतेत वाढ होईल. याचा गृह खरेदीवर सकारात्मक परिणाम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. एकूणच हा अर्थसंकल्प आमच्यासाठी चांगला आहे, असे आम्ही मानतो.
अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो - अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्राला थेट फायदा मिळालेला नाही, मात्र लोकांची आर्थिक क्षमता वाढणार असल्यामुळे गृह खरेदीच्या प्रमाणात वाढ होईल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात सध्या असलेली वृद्धी यापुढेही कायम राहील अशी आमची अपेक्षा आहे.
रणजित नाईकनवरे , उपाध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो - प्रामुख्याने मध्यमवर्गीयांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात बऱ्याच सवलती देण्यात आल्या आहेत. विशेषतः करामध्ये मध्यमवर्गीयांसाठी देण्यात आलेल्या सवलतीमुळे मध्यमवर्गीय नागरिकांची क्रयशक्ती वाढून, ते अधिक चांगल्या प्रकारे गृहकर्जाची परतफेड करू शकतील, त्यामुळे नागरिक कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित होतील. पर्यायाने बांधकाम क्षेत्राला, निश्चितच याचा लाभ होईल. अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या स्टील’चे दर कमी होऊन बांधकाम क्षेत्रातील महागाई दर कमी होईल, असे आम्हाला वाटते.
अरविंद जैन, सचिव, क्रेडाई पुणे मेट्रो - केंद्रीय अर्थसंकल्पासाठी क्रेडाई पुणे मेट्रो या संघटनेतर्फे गृहकर्जाच्या व्याजादरावर देण्यात येणाऱ्या 2 लाख रुपयांच्या सुटीची मर्यादा वाढविणे, परवडणाऱ्या घरांसाठी मूल्य ही मर्यादा न ठेवता चटई क्षेत्रावर परवडणाऱ्या घरांची व्याख्या व्हावी, रु.२० लाखपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या घरमालकांना भाडेतत्वावरील उत्पन्नात १०० % सूट देऊन प्रोत्साहन द्यावे. तसेच भांडवली मालमत्तेवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कराचा दर २०% वरून १०% आणि मालमत्तेचा मालकी कालावधी १२ महिन्यांपर्यंत कमी केला करावा, अशा चार महत्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच आयकरात ‘कॅपिटल गेन’ वरील मर्यादा १० कोटी इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या शहरातील मालमत्ता धारकांना याचा कदाचित फटका बसू शकतो.
विशाल गोखले, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स - कोरोना काळानंतर सावरत असलेल्या बांधकाम क्षेत्राला यंदाच्या अर्थसंकल्पात बऱ्याच अपेक्षा होत्या परंतु बांधकाम क्षेत्राला थेट असे काहीच मिळाले नाही. बजेट मध्ये पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर असलेला भर, अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अन्य काही बाबी अप्रत्यक्षरित्या बांधकाम क्षेत्राला फायदेशीर ठरतील अशी अपेक्षा करूयात. प्रधानमंत्री आवास योजनेला दिलेला वाढीव निधी नक्कीच स्वागतार्ह आहे.
कपिल गांधी, व्यवस्थापकीय संचालक, सिग्मा वन युनिव्हर्सल - वैयक्तिक स्वरूपात मला हा अतिशय उत्तम अर्थसंकल्प वाटतो. कारण अर्थसंकल्पात तरुण, महिला आणि स्टार्ट अप यांच्या सक्षमीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच मध्यमवर्गीय नागरिकांसाठी यामध्ये अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. बांधकाम क्षेत्र हे भावनाधारित क्षेत्र आहे. अर्थसंकल्पात कमी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी देण्यात आलेल्या सवलतींमुळे त्यांच्यामध्ये एक सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत मिळेल, कारण त्यांना होणारा आर्थिक लाभ अधिक असेल. त्यामुळे गृह खरेदी आणि एकूनच बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ते प्रोत्साहित होतील.
अभिषेक भटेवरा, कार्यकारी संचालक, रोहन बिल्डर्स - या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त आणि भविष्यातील गरजांच्या अनुषंगाने देशाला सज्ज करण्याच्या दृष्टीने सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांना देण्यात आलेले प्राधान्य हे पर्यायाने बांधकाम क्षेत्रासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. विशेषत: टायर २ आणि ३ स्वरूपातील शहरांमध्ये याचा अधिक प्रभाव होईल. रोजगार निर्मिती, तरुणांमध्ये कौशल्य विकास, कृषी उत्पादकता, आणि थेट करातील सवलत याचा गृह खरेदी आणि एकूणच बांधकाम क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल.
विनित देव, अर्थ तज्ज्ञ आणि पॉझिव्ह्यू ग्रुप’चे अध्यक्ष - अर्थसंकल्पात कर स्लब’मध्ये देण्यात आलेल्या सवलतींचा सकारात्मक परिणाम नागरिकांवर होईल. त्यामुळे गृह खरेदीमध्ये गुंतवणूक करण्यास ते प्रोत्साहित होतील. या अर्थसंकल्पात सर्वंकष विकासावर भर देण्यात आला असल्याने, ही एक आनंददायी बाब ठरत आहे. पायाभूत सुविधांचा विकास, विमानसेवांचा विकास यामुळे गुंतवणूकीला अधिक बळ मिळेल.
0 Comments