शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण; ‘सरकारवाडा’चे होणार लोकार्पण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दि. १९ फेब्रुवारी रोजी होणार लोकार्पण सोहळा    


पुणे : पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे नऱ्हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त याचे लोकार्पण होणार आहे.


या सोहळ्यानंतर शिवप्रेमींसाठी ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा खुला होणार असल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी आज ‘शिवसृष्टी’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, अरविंद खळदकर, सुधीर मुतालिक, श्रीनिवास वीरकर आणि ‘शिवसृष्टी’चे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार हे देखील या वेळी उपस्थित होते.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव आदी मान्यवर या वेळी उपस्थित असतील, अशी माहितीही कदम यांनी या वेळी दिली.


महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना १९६७ च्या एप्रिल महिन्यात सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज, अच्युतराव कोल्हटकर व मुकुंद दाबके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. १९७४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे त्रिशताब्दी वर्ष होते.


यानिमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे आयोजन मुंबईच्या शिवाजी पार्क येथे करण्यात आले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचा प्रचार सर्वत्र झाला पाहिजे या उद्देशाने १९९८-९९ साली ‘शिवसृष्टी’च्या प्रकल्पाला सुरुवात झाल्याचे कदम यांनी सांगितले.


‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग,


शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन 'रणांगण', छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभविता येईल. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.


सरकारवाडा मधील ‘दुर्गवैभव’ विभागात आजच्या तरुण पिढीला आपला जाज्वल्य इतिहास तितक्याच प्रभावीपणे समजावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात ज्या किल्यांना अत्यंत महत्वाचे स्थान होते अशा काही किल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मँपिंग केलेले असून यासाठी होलोग्राफी, अॅनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, ३ डी प्रोजेक्शन, मॅपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला असल्याचेही कदम यांनी सांगितले.


पुण्यापासून ११ किलोमीटर, विमानतळापासून २३ किलोमीटर, रेल्वेस्थानकापासून १४ किलोमीटर अंतरावर पुण्याच्या दक्षिण भागात नऱ्हे - आंबेगाव  येथे असलेली ही ‘शिवसृष्टी’ एकूण चार टप्प्यात उभारण्यात येणार असून प्रकल्पाचा खर्च साधारण ४३८ कोटी रुपये इतका आहे. पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपये आतापर्यंत उत्स्फुर्तपणे देणगीदारांकडून या प्रकल्पाला मिळाले आहेत ज्याचा उपयोग पहिल्या टप्प्याच्या उभारणीत करण्यात आला आहे. 


याबरोबरच ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी देखील उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या १२ हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला या सगळ्यांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला आता मूर्त स्वरूप येत आहे.


नजीकच्या भविष्यात पूर्णत्वास येणा-या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये २१ एकर परिसरात एक दिवसांची ‘ऐतिहासिक थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार असून महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर)द्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन अस्त्रांचे शस्त्रागार, दरबार, महाराजांनी सुरु केलेली चलने, राजमुद्रा यांबरोबरच अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदिर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पहायला मिळेल. २१व्या शतकात वावरणाऱ्या प्रत्येक टेक्नोसॅव्ही व्यक्तीला येथे आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असा हा प्रकल्प आहे.


शिवसृष्टीचा पहिला टप्पा हा लोकार्पण सोहळ्यानंतर लगेचच शिवप्रेमींसाठी खुला होईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात भवानी माता स्मारक, राजसभा व डार्क राईड, रंगमंडल यांचा तर तिसऱ्या टप्प्यात माची, गंगासागर, बहुविध आकर्षण केंद्र, कोकण आदींचा समावेश आहे. प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात बाजारपेठ, प्रेक्षागृह, वाहनतळ व अश्वारोहण, लँडस्केप- हार्डस्केप आदी कामे पुढील दोन वर्षांच्या काळात पूर्ण होतील अशी माहितीही कदम यांनी दिली.



सदर प्रकल्प पर्यटनक्षम असल्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत प्रकल्पाला मेगा टुरिझम प्रोजेक्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे ३०० हून अधिक लोकांना प्रत्यक्ष व किमान १००० लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होईल, ग्रामीण कारागिरांना येथील बाजार पेठेमध्ये पारंपारिक कलेचे प्रदर्शन करण्याकरिता प्रोत्साहित केले जाईल. यामुळे त्यांना नवीन आर्थिक उत्पनाचा लाभही घेता येईल अशा अनेक योजना या दरम्यान राबविण्यात येतील असेही विश्वस्त मंडळाने आवर्जून नमूद केले.


लोकार्पणानंतर सरकारवाडा सामान्य नागरिक व शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार असून या ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन नोंदणीद्वारे तिकीट बुक करून या ठिकाणची शिवकालीन सफर अनुभविता येणार आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती रु. ३५० (सर्व करांसहित) इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments