पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले

गाड्या वेळेवर नसल्याने प्रवाशांचे हाल, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य दखल नाही

File Photo

पुणे : लोणावळा ते पुणे लोकल ही पुणे-मुंबई मार्गावर राहणाऱ्या हजारो लोकांसाठी दररोजची जीवनवाहिनी आहे. परंतु सध्या या मार्गावरील लोकल गाड्यांचे वेळापत्रक सध्या पुरते कोलमडलेले दिसून येत आहे. या प्रकारामुळे हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


रेल्वकडून पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे अशा लोकलच्या फेऱ्या सोडण्या येतात. रेल्वेकडून जे वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे, त्यानुसार साधारणतः दर अर्ध्या ते पाऊण तासाने लोकल सुटणे अपेक्षित आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुढे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामीण भागात या लोकलला थांबे देण्यात आलेले आहेत.


पुणे-मुंबई मार्गावर राहणारे हजारो नागरिक दररोज या लोकल ट्रेनने पुणे ते लोणावळा व लोणावळा ते पुणे असा प्रवास करीत असतात. यानुसार पाहायला गेलो तर, ही लोकल या परिसरातील नागरिकांसाठी एक जीवनदायिनीच म्हणावी लागेल. अत्यंत सुलभ, स्वस्त आणि सुकर असल्या कारणाने या लोकलने मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करीत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या लोकलचे वेळापत्रक पुरते कोलमडल्याचे दिसत आहे.


लोकल गाड्या वेळेवर न येणे, वेळेवर न सुटणे, अनेक ठिकाणी वेळेपेक्षा जास्त स्टाॅपेज घेणे, दोन गाड्यांमध्ये ठरवून दिल्यापेक्षा दोन ते तीन तासांचा कालावधी असणे, असे प्रकार नित्याचेच झालेले आहेत. 


या प्रकारामुळे या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा शाळा-काॅलेजला मुकावे लागते. अनेक व्यापाऱ्यांनाही वेळापत्रक कोलमडल्याचा याचा फटका बसतो आहे.


कोरोना महामारीच्या काळात रेलवे विभागकडून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु त्या वेळी प्रवाशांची संख्या खूपच कमी असल्याने त्याचा काही त्रास झाला नाही. आता कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. तरीही रेलवे विभाग मात्र लोकल फेऱ्यांवरील निर्बंध उठवत नसल्यानेच या फेऱ्यांमध्ये मोठा अवकाश राहतो, ज्याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे.


दरम्यान, यापूर्वी अनेक प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी रेल्वचे वरिष्ठ अधिकारी हे उडवा-उडवीची उत्तरे देतात, असा प्रवाशांचा आरोप आहे. रेलवे लाईनचे काही ठिकाणी तसेच शिवाजीनगर रेलवे स्टेशनच्या एका प्लॅटफाॅर्मचे काम सुरू असल्याचे थातूरमातूर उत्तर अधिकारी देत असल्याचेही प्रवाशांनी वेबन्यूज-24 शी बोलताना सांगितले. 


दरम्यान, WebNews24 च्या वतीने पुणे रेलवे विभागाच्या पब्लिक रिलेशन आॅफीसर कार्यालयात संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून रेल्वेचे अधिकारी हे प्रवाशांच्या तक्रारींसंदर्भात किती उदासीन आहेत, हे दिसून पडते. 


गाड्यांचे कोणतेही नियोजन नाही : शैलेश बोथरा

या मार्गाने प्रवास करणारे शैलेश बोथरा यांनी सांगितले की, हा नेहमीचाच त्रास आहे. तासन् तास पुणे-लोणावळा रेलवेसाठी आम्हाला वाट पहावी लागते. या प्रकारामुळे आमची कामे खोळंबत आहेत. विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेलवे विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, अधिकारी योग्य उत्तर देत नाहीत. अधिकारी आम्हाला वरिष्ठांना ट्वीट करण्याचे सल्ले देतात. रेलवे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत, अशी प्रतिक्रिया बोथरा यांनी दिली.


वेळापत्रकात बदल नको : योगेश सोमवंशी

पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक नियमित व्हावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली आहे. पुढील काही दिवसांत यात बदल होतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. गर्दीच्या वेळी शिवाजीनगर स्टेशनवरून तर इतर वेळेस पुणे स्टेशनवरून गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. परंतु आम्ही मागणी केलील आहे की, सकाळी 11 वाजेपर्यंत पुणे स्टेशनवरूनच गाड्या सोडल्या जाव्यात. तसेच 11 ते 4 या वेळेत जेंव्हा गर्दी कमी असते, तेंव्हा शिवाजीनगर स्टेशनवरून सोडण्यात याव्यात.


टाईम टेबलनुसार कोणताही बदल करू नये. दुपारच्या सुमारास लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठा अवकाश आहे. तो अवकाश कमी करावा, म्हणजे दुपारी ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार नाहीत. पीक-अप अवरमध्ये गाड्यांची संख्या वाढवावी. याशिवाय पुणे स्टेशनवरील प्लॅटफाॅर्म नं. 4, 5 व 6 वर लिफ्ट आणि रॅम्प सुरू करावा. जेणेकरून वरिष्ठ नागरिकांना, रुग्णांना त्रास होणार नाही, अशा मागण्या वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे-लोणावळा प्रवासी कृती समितीचे योगेश सोमवंशी यांनी दिली.




Post a Comment

0 Comments