डी पी रस्त्यावरील केशवबाग येथे आयोजन
राजाराम पुलाजवळील डी पी रस्ता येथील केशवबाग येथे शनिवार दि ४ मार्च रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री १० दरम्यान महोत्सवाचे पहिले सत्र होईल. यानंतर रविवार दि ५ मार्च रोजी सकाळी ७ ते १० दरम्यान दुसरे सत्र तर रविवार दि ५ मार्च रोजी सायं ४.३० ते रात्री १० दरम्यान महोत्सवाचे तिसरे व शेवटचे सत्र संपन्न होईल. महोत्सवाचे प्रत्येक दिवशीचे तिकीट हे रु. १०० तर सीझन तिकीट हे रु. २०० इतके असणार आहे, अशीही माहिती पणशीकर यांनी या वेळी दिली.
ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या गानसरस्वती महोत्सवाचे हे नववे वर्ष असून कोविडनंतर पहिल्यांदाच महोत्सव होत असल्याचा आनंद असल्याचे पं रघुनंदन पणशीकर यांनी आवर्जून नमूद केले.
शनिवार दि ४ मार्च रोजी (सायंकाळी ४.३० ते रात्री १०) होणाऱ्या पहिल्या सत्राची व यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंगवादनाने होईल. यानंतर प्रसिद्ध गायिका डॉ. अलका देव मारुलकर यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर पं रूपक कुलकर्णी आपले बासरीवादन प्रस्तुत करतील. पं कुमार गंधर्व यांचे सुपुत्र व शिष्य पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि ५ मार्च रोजी (सकाळी ७ ते १० दरम्यान) होणाऱ्या सकाळच्या सत्राची सुरुवात संगीतमार्तंड पं जसराज यांचे शिष्य व मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने होईल. यानंतर इमदादखानी घराण्याचे जग प्रसिद्ध सतार वादक पं बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन होईल.
तिसऱ्या सत्राचा प्रारंभ (रविवार ५, मार्च सायं ४.३० ते रात्री १०) गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या बंगळूरूस्थित शिष्या विदुषी संगीता कट्टी यांच्या गायनाने होईल. यानंतर प्रसिद्ध गायिका पद्मश्री शुभा मुदगल यांचे गायन होईल. त्यानंतर फारुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक अनिंदो चॅटर्जी यांचे एकल तबलावादन होईल. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे सुपुत्र व गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.
‘नाट्यसंपदा प्रतिष्ठान’च्या देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ यावर्षी डॉ अलका देव मारुलकर यांना जाहीर झाला आहे. सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप रोख रु. ५१ हजार व मानचिन्ह असे आहे. याबरोबरच ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी यांना प्रदान करण्यात येईल. रोख रु. २५ हजार व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (रविवार ५ मार्च) रोजी तो प्रदान करण्यात येईल असेही पं रघुनंदन पणशीकर यांनी सांगितले.
महोत्सवाच्या सशुल्क प्रवेशिका रविवार दि. २६ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड या ठिकाणी उपलब्ध असणार असल्याचेही पणशीकर यांनी सांगितले.
0 Comments