‘विषय' प्रदर्शनीचे उद्घाटन; रविवार पर्यंत असणार प्रदर्शनी
पुणे : महिलांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळावे या हेतून आज अनेक प्रदर्शने आयोजित केली जातात. महिलांमध्ये असलेल्या कौशल्यांना प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास ही कौशल्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील. यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने खास महिलांसाठी अनेकविध कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत असते त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ महिलांनी नक्की घ्यावा, असे प्रतिपादन भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘विषय' या प्रदर्शनीचे उद्घाटन आज कुलकर्णी यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना येथील क्लब हाऊस या ठिकाणी संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रदर्शनीच्या संयोजिका प्राची वाघ यादेखील या प्रसंगी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना प्रा कुलकर्णी म्हणाल्या, “आज प्रत्येकाला काहीतरी नवी गोष्ट ‘ट्राय’ करायची असते. मार्केटमध्ये असलेला नवनवा ट्रेंड लक्षात घेत त्याप्रमाणे महिलांनी प्रशिक्षण घ्यायला हवे. आपल्याकडे ग्राहकांना या सर्व नव्या गोष्टी हव्या आहेत फक्त त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महिला उद्योजकांनी करायला हवा.”
शिल्पा तुळसकर या अभिनय क्षेत्रात नावाजलेल्या कलाकार आहेत मात्र, त्यांनी महिला उद्योजकांसाठी राबविलेला हा उपक्रम वाखाणण्याजोगा असल्याचे सांगत मेधा कुलकर्णी यांनी शिल्पा तुळसकर यांचे कौतुक केले.
‘विषय’ या उपक्रमाबद्दल बोलताना अभिनेत्री शिल्पा तुळसकर म्हणाल्या, “माझ्या अनेक मैत्रिणी हस्तकलांशी संबंधित व्यवसाय करतात. हे करत असताना त्या आपलं घर, संसार सांभाळून आपली कला जोपासत असतात. अशाच माझ्या राज्यभरातील मैत्रिणींना आपले हे कौशल्य ग्राहकांसमोर सादर करण्याचे व्यासपीठ मिळवून द्यावे. या उद्देशाने आम्ही या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहोत.
केवळ प्रदर्शन इतक्यावरच न थांबता या अंतर्गत कला, संगीत व कार्यक्रम यांचेही आयोजन आम्ही करणार आहोत." नजीकच्या भविष्यात राज्यभरात विविध ठिकाणी आम्ही ही प्रदर्शनी घेऊन जात तिथल्या महिलांना व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही तुळसकर यांनी नमूद केले.
शनिवार व रविवार (दि. २५ व २६ फेब्रुवारी) दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत डेक्कन जिमखाना येथील क्लब हाऊस या ठिकाणी सदर प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. विविध ब्रँड्सचे कपडे, साड्या, दागिने, अॅक्सेसरीज, होम डेकॉर यांसोबतच अनेकविध मातीच्या, हस्तकलेच्या वस्तू, बचत गटांनी बनविलेले पदार्थ यांचा आस्वाद या प्रदर्शनीमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे.
प्रदर्शनीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोल्हापूरच्या चेतना फाउंडेशन, पुण्याच्या गुडविल इंडिया, सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून काही बचत गट अशा स्वयंसेवी संस्थांचेही स्टॉल्स असणार असून त्यांच्या सेवा आणि त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन देखील या ठिकाणी असणार आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर अभिनेते अभिषेक रहाळकर यांचा मराठी व उर्दू गझलांचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. ‘विषय' प्रदर्शनीला मुंबईच्या सुगी ही बांधकाम व्यवसायातील संस्था, पी एन जी ज्वेलर्स, वरांडा रेस्टॉरंट, एरंडवणे आणि टू गुड रेस्टॉरंट, औंध यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
0 Comments