आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

‘श्रद्धा सुमन’ कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा समारोप


पुणे : विदुषी आरती अंकलीकर - टिकेकर यांच्या बहारदार गायनाने ‘श्रद्धा सुमन’ कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल संस्थेच्या वतीने 'श्रध्दा सुमन' या विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी पं.अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.


सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम श्रुखंलेतील हा पाचवा कार्यक्रम असणार असून कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालिका सुनीता आसवले व समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. दिनेश डोके उपस्थित होते.


श्रद्धा सुमन या कार्यक्रमाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा समारोप विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग बागेश्रीने आपल्या गायनाला सुरुवात केली. रुपक तालातील 'कौन गत भयी... ' ही बंदिश त्यांनी प्रस्तुत केली.


यांनतर पंचम सवारी तालातील ' जाओ सैया जाओ' ही रचना तर त्यानंतर एक तराणा त्यांनी प्रस्तुत केला. ' देर्नाना लगाओ प्रीतम प्यारे...' या त्यांनी प्रस्तुत केलेल्या बंदिशीचे उपस्थितांची मने जिंकली.'झुलन बंधाओ... ' हा झुला गात त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अरविंद कुमार आझाद (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) अनुराधा मंडलेकर व स्वरूपा बर्वे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.    


कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी (रविवार २९ जानेवारी) स्वरयोगिनी पद्म विभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व किराणा घराण्याच्या गायिका आरती ठाकूर- कुंडलकर यांचे गायन होईल. त्यानंतर पं. किशन महाराज यांचे शिष्य व बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक सुखविंदर सिंग नामधारी यांचा अनोखा असा तबला आणि जोडीवादन कार्यक्रम होईल.


जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने कार्यक्रमाच्या दुसऱ्या  दिवसाची सांगता होईल. सदर कार्यक्रमास प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments