कलाश्री संगीत महोत्सवात गायन-वादनाची सुरेल अनुभूती


पुणे : पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं.आनंद भाटे आणि पंडित सुधाकर चव्हाण यांच्या कन्या व शिष्या शाश्वती चैतन्य यांचे बहारदार गायन आणि तबलावादक यशवंत वैष्णव यांचे दमदार प्रस्तुतीने रंगलेला सुरेल सांगीतिक कार्यक्रम रसिकांनी अनुभवला. निमित्त होते कलाश्री संगीत महोत्सवाचे.


कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित या तीन दिवसीय संगीत महोत्सवास शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी पासून सुरूवात झाली. नवी सांगवी येथील निळू फुले सभागृह येथे संपन्न होत असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन राज्याच्या जलसंपदा विभागाचे माजी सचिव अविनाश सुर्वे यांच्या हस्ते दीप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.


याप्रसंगी पिंपरी - चिंचवड महानगपालिकेच्या माजी महापौर माई ढोरे,कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष आरती राव, मंडळाचे सदस्य मनोहर शेठ ढोरे, चंद्रा रामय्या, प्रणाली विचारे, समीर महाजन,सुधीर दाभाडकर, जवाहर ढोरे उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरवातीला राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तबलावादन झाले. त्यांनी तीन तालात उठान सादर करत, आपल्या वादनाची सुरूवात केली. कायदा , तुकडा सादर करत त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.


त्यानंतर कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राग भीमपलासी'मध्ये 'जा जा रे अपने मंदिरवा...' ही बंदिश व जय शारदे वाघेश्वरी' हे गीत सादर केले.


त्यानंतर गायिका शाश्वती चव्हाण यांचे गायन झाले. त्यांनी राग मुलतानी'ने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यामध्ये ' गोकुल गाव... ' ही विलंबित एकतालातील बंदिश आणि ' कंगण मुंदरिया ' ही द्रुत तीन तालातील बंदिश त्यांनी सादर केली. 'विष्णुमय जग...' या अभंगांद्वारे त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर ( हार्मोनियम) , पांडुरंग पवार ( तबला ) यांनी साथ केली.


त्यानंतर यशवंत वैष्णव यांचे तबला वादन झाले. त्यांनी सुरुवात तीनतालाने आपल्या सादरीकरणाची सुरूवात केली. त्यानंतर कायदे, पारंपारीक कायदे रेला सादर केले. त्यांना हार्मोनियमसाठी अभिषेक शिनकर यांनी साथ केली.


 महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप पंडित आनंद भाटे यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग'मध्ये मारुबिहाग विलंबित एक तालातील बंदिश 'रसिया आओ न जाओ...' आणि द्रुत तीनतालात 'तरपत रैन...' ही बंदिश सादर केली,  'अगा वैकुंठीच्या राया' ने या भैरवीने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना हार्मोनियमसाठी सुयोग कुंडलकर यांनी व भरत कामत यांनी तबल्यासाठी साथ केली.


Post a Comment

0 Comments